आपल्या जादुई आवाजाने महाराष्ट्रासह राज्याबाहेरही कीर्तनाचा ठसा उमटविणारे ह.भ.प. संजीव महाराज सोनवणे चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...
आपल्या जादुई आवाजाने महाराष्ट्रासह राज्याबाहेरही कीर्तनाचा ठसा उमटविणारे ह.भ.प. संजीव महाराज सोनवणे
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आपल्या बुलंद, पहाडी आणि ओजस्वी आवाजाच्या बळावर महाराष्ट्रासह राज्याबाहेरील श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे प्रख्यात कीर्तनकार तथा व्याख्यानकार ह.भ.प. संजीव महाराज सोनवणे (गलवाडेकर) यांनी आपल्या प्रभावी कीर्तन व व्याख्यानांद्वारे हातेड परिसरासह चोपडा तालुक्याचे नाव राज्यभर गौरवाने पोहोचविले आहे.
चोपडा तालुक्यातील गलवाडे या छोट्याशा गावात जन्मलेल्या संजीव महाराजांनी आध्यात्मिक शिक्षण घेतल्यानंतर समाजप्रबोधनाचा ध्यास घेतला. गावोगावी आयोजित होणारे कीर्तन सप्ताह, भागवत कथा, हरिनाम सप्ताह तसेच विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमधून त्यांनी वारकरी संप्रदायाची शिकवण, संत ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांचे विचार आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविली आहेत.
ग्रामीण भागात कीर्तन हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे, स्वराज्याच्या इतिहासाचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडविले आहे. त्यांच्या ओजस्वी शैलीमुळे श्रोते भारावून जातात.
महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने ते महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, हिंदुकुलसूर्य महाराणा प्रताप आदी महापुरुषांच्या जीवनकार्यावर कीर्तन व व्याख्यानांच्या माध्यमातून समता, शिक्षण, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत असतात.
शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये त्यांच्या व्याख्यानांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, 'पाणी अडवा, पाणी जिरवा', साक्षरता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती यांसारख्या विविध सामाजिक विषयांवर ते प्रभावी मार्गदर्शन करतात.
आषाढी वारीच्या पर्वकाळात ते गावोगावी जाऊन नागरिकांना पंढरपूर वारीत सहभागी होण्यासाठी प्रेरित करतात. वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश जनमानसात रुजविण्याचे कार्यही ते सातत्याने करत आहेत.
ह.भ.प. संजीव महाराज सोनवणे यांनी आध्यात्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक क्षेत्रात केलेल्या बहुमोल कार्याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त केले जात आहे. आपल्या ज्ञानसंपदेच्या आणि प्रभावी वाणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

No comments