पोलिसांना गुंगारा देणाऱ्या 'मास्टरमाईंड' चा गेम ओव्हर..! खुनाच्या प्रयत्नातील मुख्य सूत्रधाराला LCB ने असं घेतलं ताब्यात... सचिन म...
पोलिसांना गुंगारा देणाऱ्या 'मास्टरमाईंड' चा गेम ओव्हर..! खुनाच्या प्रयत्नातील मुख्य सूत्रधाराला LCB ने असं घेतलं ताब्यात...
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- श्रीरामपूर शहरात घडलेल्या एका खळबळजनक खंडणी आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील,गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत चाणाक्षपणे आणि गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी (११ जुलै) रोजी ही धडक कारवाई केली.अजहर युसुफ शेख (वय २२,रा.वार्ड नं.०१, संजयनगर,श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.२२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती.फिर्यादी हे आपल्या स्विफ्ट कारमधून बीफ मार्केट परिसराकडे जात होते.याच दरम्यान आरोपी सर्फराज बाबा शेख,इरफान मोईनुद्दीन शेख उर्फ इप्प्या,लुकमान इसाक शहा,राहुल भिमा सोनवणे आणि अजहर शेख यांनी फिर्यादीची कार अडवली. आरोपींनी फिर्यादीकडे तब्बल ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.फिर्यादीने ही रक्कम देण्यास साफ नकार दिला.पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार कोयत्याने बेदम मारहाण केली.या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९, ११५(२), १२६(२), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ३०८(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर आरोपी अजहर शेख फरार झाला होता.पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे यांनी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केले होते.या पथकात पोउपनि संदीप दरवडे,पोलीस अंमलदार फुरकान शेख, रमीजराजा आतार,प्रकाश मांडगे,सुनील मालनकर, मनोज मोहन साखरे आणि प्रशांत राठोड यांचा समावेश होता.हे पथक तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आरोपींचा माग काढत होते.११ जुलै रोजी गुप्त बातमीदाराकडून पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की,फरार आरोपी अजहर युसुफ शेख हा श्रीरामपूर येथील संजयनगरमधील त्याच्या राहत्या घरी आला आहे.माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याच्या घरावर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी अजहर याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता,त्याने आपल्या इतर साथीदारांसह मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी आरोपीला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने ही धडक कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

No comments