सेवेचा आदर्श प्रवास : विस्तार अधिकारी अंबादास धोंडीराम चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा गेवराई | प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
सेवेचा आदर्श प्रवास : विस्तार अधिकारी अंबादास धोंडीराम चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा
गेवराई | प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्हा परिषद बीडच्या समाजकल्याण विभागात विस्तार अधिकारी (पंचायत) म्हणून प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावणारे श्री. अंबादास धोंडीराम चव्हाण हे ३० जून २०२६ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या तब्बल ३३ वर्षांच्या समर्पित, प्रामाणिक आणि लोकाभिमुख सेवेला मानवंदना देण्यासाठी रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता गेवराई येथील भाग्यलक्ष्मी लॉन्स, कोल्हेर रोड येथे भव्य सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अंबादास चव्हाण यांचा जन्म ६ जून १९६८ रोजी झाला. त्यांनी कृषी पदविका तसेच बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १५ जून १९९३ रोजी पंचायत समिती गेवराई येथे ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेत २९ नोव्हेंबर १९९९ रोजी ग्रामविकास अधिकारी म्हणून पहिली पदोन्नती मिळाली. त्यानंतर २४ मार्च २००५ रोजी विस्तार अधिकारी (पंचायत) या पदावर पदोन्नती होऊन त्यांनी पंचायत समिती माजलगाव येथे जबाबदारी स्वीकारली. आपल्या सेवाकाळात श्री. चव्हाण यांनी अनेक नाविन्यपूर्ण व लोकहिताचे उपक्रम राबविले. सन २००१-०२ मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांच्या कार्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीला प्राप्त झाला. हा पुरस्कार तत्कालीन ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते स्वीकारण्याचा मान त्यांना मिळाला. त्याच वर्षी आदर्श अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आणि विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सन २००३-०४ मध्ये सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणूनही त्यांची निवड झाली.
त्यांनी विविध ठिकाणी यशस्वीपणे सेवा बजावत प्रशासनाला सक्षम नेतृत्व दिले. १५ जून १९९३ ते २३ मार्च २००५ या कालावधीत पंचायत समिती गेवराई, २४ मार्च २००५ ते १५ मार्च २०१० पंचायत समिती माजलगाव, १६ मार्च २०१० ते ३० ऑगस्ट २०१४ पंचायत विभाग, जिल्हा परिषद बीड आणि १ सप्टेंबर २०१४ ते ३० जून २०२६ या कालावधीत समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद बीड येथे त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली.
या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास आद्य परमसद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांचे शुभाशीर्वाद लाभणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त रवीकांतजी शिंदे राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत अरुणजी पवार, अनिरुद्ध सानप, तसेच विशेष अतिथी म्हणून एस. एन. मेश्राम (जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि.प. बीड) आणि राहुल गिरी उपस्थित राहणार आहेत. आद्य दादाजी स्पिरिच्युअल फाउंडेशन तसेच आद्य स्वामी शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठान, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास सहकारी अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री. अंबादास चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments