खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा गोळाफेक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव ...
खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
गोळाफेक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी हॉकीचे जादूगार व महान भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे, खेळाचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्देशाने क्रीडा दिनानिमित्त गोळाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गणेश सदाशिव चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गोळा फेक स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आपल्या क्रीडागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी दाखविलेला उत्साह, शिस्त आणि क्रीडा भाव विशेष उल्लेखनीय ठरला.
याप्रसंगी प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा कारकिर्दीचा तसेच देशासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा परिचय करून दिला. खेळ हा केवळ विजय - पराजया पुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासा सोबतच शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्यांनी आपल्या उद्बोधक भाषणातून सांगितले. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले. विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
गोळा फेक स्पर्धेतील विजेते
मुलांमध्ये :
प्रथम क्रमांक — सुमित पाटील
द्वितीय क्रमांक — सुमित राजेंद्र पाटील
तृतीय क्रमांक — दीपक गुरचळ
मुलींमध्ये :
प्रथम क्रमांक — रितिका महाजन
द्वितीय क्रमांक — कशिश पाटील
तृतीय क्रमांक — फाल्गुनी कोळी
स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयी उत्साह, स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

No comments