ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक मिरवणूक परवानगीच्या मार्गावरूनच काढावी; आक्षेपार्ह घोषणा...
ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
मिरवणूक परवानगीच्या मार्गावरूनच काढावी; आक्षेपार्ह घोषणा, शस्त्र प्रदर्शन व सोशल मीडियावरील चुकीच्या व्हिडिओंवर पोलिसांचा इशारा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने चोपडा शहर पोलीस ठाण्यात मोहल्ला कमिटी व शांतता समितीची बैठक घेण्यात आली. आगामी मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम समाजातील पंच कमिटी सदस्य, मौलवी तसेच प्रतिष्ठित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ श्री. अशोक नखाते होते. यावेळी चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील पाटील, चोपडा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, अडावदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यांतील पंच कमिटी सदस्य, मौलवी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी पोलिस प्रशासनाने ईद-ए-मिलादची मिरवणूक पोलिस प्रशासनाने दिलेल्या परवानगीच्या मार्गावरूनच काढावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत, आक्षेपार्ह इशारे करू नयेत तसेच विनाकारण कोणतेही ध्वज फडकवू नयेत, असे सांगण्यात आले.
तसेच मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचे शस्त्र प्रदर्शन करू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, मिरवणुकीपूर्वी किंवा मिरवणुकीच्या अनुषंगाने चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, अशाही सक्त सूचना देण्यात आल्या. कोणत्याही व्यक्तीच्या गैरवर्तनामुळे अथवा कृत्यामुळे शहरातील शांतता व सामाजिक सलोखा भंग होऊन अशांतता निर्माण झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला.
ईद-ए-मिलादची मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


No comments