जिल्हास्तरीय बॅडमिंटन पंच परीक्षेचे आयोजन अधिकृत पंच होण्याची क्रीडाप्रेमींना सुवर्णसंधी; ३० ऑगस्ट रोजी मलकापूर येथे परीक्षा अमोल बावस्कार...
जिल्हास्तरीय बॅडमिंटन पंच परीक्षेचे आयोजन
अधिकृत पंच होण्याची क्रीडाप्रेमींना सुवर्णसंधी; ३० ऑगस्ट रोजी मलकापूर येथे परीक्षा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : बुलढाणा जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाला अधिक चालना मिळावी, खेळाचा दर्जा उंचावावा आणि जिल्ह्यात अधिकृत पंचांची संख्या वाढावी, या उद्देशाने जिल्हास्तरीय बॅडमिंटन पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा यांच्या वतीने या परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून, असोसिएशनचे अध्यक्ष मनीष लखाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
बॅडमिंटन खेळाची आवड असणाऱ्या तसेच या क्षेत्रात अधिकृत पंच म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींसाठी ही एक उत्तम संधी आहे. परीक्षेसाठी उमेदवाराला बॅडमिंटन खेळाची प्राथमिक माहिती असणे आवश्यक असून, किमान १८ वर्षे वय पूर्ण असणे बंधनकारक आहे. सक्रिय खेळाडू तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
या पंच परीक्षेत बॅडमिंटनच्या अधिकृत नियमांवर आधारित लेखी परीक्षा तसेच कोर्टवरील प्रात्यक्षिक परीक्षा, अशा दोन्ही घटकांचा समावेश असणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये अधिकृत पंच म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर परीक्षा रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता जे. के. वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथील ‘इंदोर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर’ येथे आयोजित करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपली नावनोंदणी ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे २४ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणाचे सचिव विजय पळसकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी खिझर ह्यात खान आणि प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments