चोपडा तालुक्यात हृदयद्रावक घटना; जन्मदात्या बापाकडून दोन लेकरांवर कुऱ्हाडीने हल्ला १३ वर्षीय मुलीचा मृत्यू; ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, आरो...
चोपडा तालुक्यात हृदयद्रावक घटना; जन्मदात्या बापाकडून दोन लेकरांवर कुऱ्हाडीने हल्ला
१३ वर्षीय मुलीचा मृत्यू; ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, आरोपी बाप अटकेत; हल्ल्यामागील कारणांचा शोध सुरू
चोपडा ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जन्मदात्या बापाने स्वतःच्या दोन निष्पाप मुलांवर झोपेत असताना धारदार कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष हल्ल्यात मीरा सुभाष भिलाला (वय १३) हिचा जागीच मृत्यू झाला असून रामू सुभाष भिलाला (वय ११) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडती येथील रहिवासी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) याने स्वतःची दोन्ही मुले गाढ झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे.
घटना घडल्यानंतर आरोपी सुभाष भिलाला हा घटनास्थळावरून पळ काढून जवळील जंगलात लपून बसला. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित शोधमोहीम राबवत आरोपीला जंगलातून ताब्यात घेतले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासानुसार, दोन्ही मुले घरात झोपलेली असताना त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या अमानुष कृत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा अन्य कोणते कारण या घटनेस कारणीभूत आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास पोलीस करत आहेत.
अडावद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त केले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण चोपडा तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीती, संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
जन्मदात्या बापाने स्वतःच्या लेकरांवरच एवढे क्रूर पाऊल का उचलले, याचे उत्तर अद्याप मिळाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.

No comments