जळगाव जिल्ह्यात ११२ आदिवासीबहुल गावांत ‘जनसुनावणी’; १३ ते १५ ऑगस्टदरम्यान आदि सेवा केंद्रांवर आयोजन आदिवासी समाजाच्या तक्रारी, समस्या व वि...
जळगाव जिल्ह्यात ११२ आदिवासीबहुल गावांत ‘जनसुनावणी’; १३ ते १५ ऑगस्टदरम्यान आदि सेवा केंद्रांवर आयोजन
आदिवासी समाजाच्या तक्रारी, समस्या व विकासाच्या अपेक्षा थेट प्रशासनापर्यंत; अधिकाधिक ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : आदिवासी समाजाच्या समस्या, तक्रारी आणि विकासाच्या अपेक्षा थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आदि सेवा केंद्रांवर ‘जनसुनावणी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील ११२ आदिवासीबहुल गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून, आदिवासी समाजाचा शासनाच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.
मा. रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव तसेच मा. करिष्मा नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार जिल्ह्यात या जनसुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आदि सेवा केंद्रांच्या माध्यमातून गावपातळीवरील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणून घेणे, त्यांची नोंद करणे तसेच संबंधित विभागांच्या माध्यमातून त्यावर वेळेत कार्यवाही करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. याशिवाय आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची स्थिती आणि सेवा वितरणातील अडचणी यांचाही आढावा घेतला जाणार आहे.
ग्रामस्थांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत
जनसुनावणीदरम्यान आदिवासी समाजातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यात संवाद साधला जाणार आहे. गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा, शासकीय योजना, वनहक्क, सामाजिक सुरक्षा तसेच इतर स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.
या जनसुनावणीचा प्रमुख उद्देश आदिवासी समुदायांना संघटित करून त्यांच्या तक्रारींची नोंदणी सुलभ करणे आणि संबंधित तक्रारींवर वेळेत कार्यवाही सुनिश्चित करणे हा आहे. जनसुनावणीतील कार्यवाही आणि नोंदविण्यात आलेल्या तक्रारी जनसुनावणी पोर्टलवर ऑनलाइन अपलोड करण्यात येणार आहेत.
जनसुनावणी पोर्टल
https://adiprasaran.tribal.gov.in/jansunwai
विकास नियोजनात आदिवासी समाजाचा सहभाग
आदिवासी व्यवहार मंत्रालय हे देशातील अनुसूचित जमातींच्या विकासासाठी धोरण, नियोजन व समन्वय करणारे नोडल मंत्रालय आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक जतन आणि प्रशासकीय सुधारणा अशा विविध क्षेत्रांमध्ये आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात.
आदि सेवा केंद्रे ही गावपातळीवरील महत्त्वाची व्यासपीठे म्हणून कार्यरत असून, स्थानिक समस्या जाणून घेणे, तक्रारींचे निवारण करणे आणि गावाच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी या केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. जनसुनावणीच्या माध्यमातून ‘गावातील समस्या – ग्रामस्थांचा आवाज – प्रशासनाची कार्यवाही’ हा समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमामुळे आदिवासी समाजाच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यांची नोंद, कार्यवाही आणि त्याचा मागोवा घेण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
विविध विभागांचा सक्रिय सहभाग
जळगाव जिल्ह्यातील या उपक्रमात आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जिल्हा पेसा कक्ष, ग्रामपंचायत विभाग तसेच संबंधित गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
आदिवासी समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या गावात आयोजित करण्यात येणाऱ्या जनसुनावणीमध्ये उपस्थित राहून आपल्या समस्या, तक्रारी व विकासाच्या अपेक्षा प्रशासनासमोर मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा पेसा कक्ष व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
— प्रदीप आर. बाविस्कर
जिल्हा व्यवस्थापक – पेसा
जिल्हा परिषद, जळगाव

No comments