बाबासाहेबांच्या स्वप्नांचा जागर; निलंग्यात समता सैनिक दलाचे शिबिर... माता-भगिनींच्या शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष; समता, स्वाभिमान अन् संघ...
बाबासाहेबांच्या स्वप्नांचा जागर; निलंग्यात समता सैनिक दलाचे शिबिर...
माता-भगिनींच्या शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष; समता, स्वाभिमान अन् संघटनाचा दिला संदेश.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वाभिमान आणि संघटनेच्या विचारांना कृतीची जोड देत निलंगा येथे आयोजित करण्यात आलेले ‘समता सैनिक दल शिबिर’ उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. विशेषतः माता-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि त्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने शिबिराचे वातावरण भारावून गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, संघटन, समता आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखविला. त्याच विचारांना पुढे नेत समाजात शिस्त, सामाजिक जाणीव आणि संघटनात्मक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरासाठी लातूरहून विशेष उपस्थित राहिलेले सैनिक शिक्षक मा. अभिमन्यू लामतुरे व मा. विकास दंतराव यांनी उपस्थित महिला व सैनिकांना लष्करी शिस्त, संचलन तसेच संघटनात्मक कार्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा, निलंगा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.तालुका अध्यक्ष बी.आर.गायकवाड, सरचिटणीस भागेश कांबळे, कोषाध्यक्ष अनिल गाडे, संरक्षण उपाध्यक्ष विशाल गायकवाड आणि संस्कार उपाध्यक्ष इंद्रजीत कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
शिबिरासाठी सुरक्षित व प्रसन्न वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा मंजुषा निंबाळकर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
शिबिराला उपस्थित राहिलेल्या सर्व माता-भगिनी, सैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. समता सैनिक दलाच्या माध्यमातून शिस्त, समता, बंधुता आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये समाजात रुजविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
माता-भगिनींच्या शिस्तबद्ध संचलनातून ‘समतेचा विचार केवळ बोलायचा नाही, तर तो कृतीत उतरवायचा’ असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. बाबासाहेबांनी पाहिलेल्या समताधिष्ठित, स्वाभिमानी आणि संघटित समाजनिर्मितीच्या दिशेने हे शिबिर एक प्रेरणादायी पाऊल ठरले.

No comments