रक्षाबंधनानिमित्त महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना बहिणीचे वचन! “अन्याय-अत्याचार होत असेल तर आपल्या या बहिणीला एक कॉल करा; न्याय मिळवून द...
रक्षाबंधनानिमित्त महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना बहिणीचे वचन!
“अन्याय-अत्याचार होत असेल तर आपल्या या बहिणीला एक कॉल करा; न्याय मिळवून देण्यासाठी सदैव सोबत राहीन” — सौ. अर्चना राजेंद्र पाटील
वाशिम : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव-भगिनी तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना रूद्र अपंग संघटनच्या महाराष्ट्र राज्य प्रादेशिक महिला अध्यक्ष व नियुक्ती प्रमुख सौ. अर्चना राजेंद्र पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे भावनिक वचन दिले.
दिव्यांग बांधवांवर कुठेही अन्याय किंवा अत्याचार होत असेल, त्यांना न्याय मिळत नसेल, हिणवले जात असेल, तुच्छ लेखले जात असेल, कागदपत्रे पूर्ण असूनही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसेल किंवा कुटुंबात अथवा समाजात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात असेल, तर त्यांनी न घाबरता आपल्या समस्या संघटनेसमोर मांडाव्यात, असे आवाहन सौ. अर्चना पाटील यांनी केले.
“आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्या या बहिणीला फक्त एक कॉल करा. प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे किंवा संदेशाच्या माध्यमातून आपली समस्या सांगा. आपल्या अडचणी सोडवून न्याय मिळवून देण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन, हे माझे वचन आहे,” असे त्यांनी सांगितले.
रूद्र अपंग संघटनेने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी ही केवळ एक पद नसून दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी मिळालेली संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्या आणि अडचणी संघटनेसमोर मांडाव्यात. सर्वांनी एकजुटीने सहकार्य केले, तर अनेक प्रश्न मार्गी लावता येतील आणि दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर खरे हास्य निर्माण करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आत्मविश्वास हीच खरी ताकद
दिव्यांग बांधवांनी स्वतःला कधीही कमी समजू नये, असा सकारात्मक संदेश देताना सौ. अर्चना पाटील म्हणाल्या की, “आपण कुठेही कमी नाही. आपल्या स्वतःमधील आत्मविश्वास जागृत करा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. जग आपल्याकडे विश्वासाने पाहण्यासाठी सर्वप्रथम आपण स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.”
“मी स्वतः ८८ टक्के दिव्यांग आहे; मात्र मी स्वतःला कधीही केवळ दिव्यांग म्हणून पाहिले नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जात राहिले. जर कोणी आपल्या दिव्यांगत्वाची वारंवार जाणीव करून देत असेल किंवा चेष्टा करत असेल, तर त्याच्या नकारात्मक विचारांचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. स्वतःला कधीही कमी समजू नका,” असे आवाहन त्यांनी केले.
“प्रत्येक क्षण आनंदाने जगा”
जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश देताना त्या म्हणाल्या की, “मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक सेकंदाचा आनंद हा जीवनातील शेवटचा क्षण समजून घेते. म्हणूनच प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करते. हाच खरा आनंद आणि आत्मविश्वास महाराष्ट्रातील माझ्या प्रत्येक दिव्यांग बांधव-भगिनीच्या जीवनात निर्माण करायचा आहे.”
रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांनी एकमेकांना एकजुटीचा, सकारात्मक विचारांचा आणि आत्मविश्वासाचा धागा बांधावा, असे आवाहनही सौ. अर्चना पाटील यांनी केले.
“आम्ही कुठेही कमी नाही, आम्ही सक्षम आहोत, आत्मविश्वासी आहोत आणि आमच्या हक्कांसाठी एकजुटीने उभे राहू शकतो,” हा संदेश समाजासमोर पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव-भगिनींनी आपला आत्मविश्वास जागृत करून आनंदाने जीवन जगावे, आपल्या हक्कांसाठी संघटित व्हावे आणि एकमेकांना साथ द्यावी, हीच रक्षाबंधनाची सर्वात मोठी भेट माझ्यासाठी असेल, अशी भावना सौ. अर्चना राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली.
— सौ. अर्चना राजेंद्र पाटील
महाराष्ट्र राज्य प्रादेशिक महिला अध्यक्ष व नियुक्ती प्रमुख,
रूद्र अपंग संघटन, वाशिम

No comments