adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावित्रीमाईला न्याय हवा ! महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही भव्य पुतळा उभारावा

  सावित्रीमाईला न्याय हवा ! महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही भव्य पुतळा उभारावा     लातू...

 सावित्रीमाईला न्याय हवा ! महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही भव्य पुतळा उभारावा 


   लातूर,जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जिने भारतीय स्त्रीच्या हातात पहिल्यांदा ज्ञानाची पाटी दिली... जिने दगड, शेणफेक, अपमान आणि सामाजिक बहिष्कार सहन करूनही शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली... ज्या महामातेने अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला समतेचा आणि शिक्षणाचा प्रकाश दिला, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या कार्याला साजेसा सन्मान मिळावा, इतिहासाने त्यांच्यावर केलेला अन्याय दूर व्हावा आणि भावी पिढ्यांसमोर त्यांचे कार्य अजरामर व्हावे, या उदात्त भावनेतून सोमवारी लातूर शहरातील सर्व समाजातील महिला,सामाजिक कार्यकर्ते आणि समतावादी नागरिक एकवटले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील विद्यमान क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीचे स्वाक्षरीयुक्त निवेदन महानगरपालिका आयुक्त, महापौर आणि लोकप्रतिनिधींना सादर करण्यात आले. 


विविध समाजघटकांतील महिला, शिक्षिका, विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्त्या, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो समतावादी नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून मागणीला भक्कम पाठिंबा दिला.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा विचार मांडला, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी तो प्रत्यक्ष कृतीत उतरवून १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या.

समाजातील कट्टर विरोध, दगडफेक, शेणफेक आणि अमानुष छळ सहन करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचा दीप विझू दिला नाही. मुली शिकल्या पाहिजेत, हा त्यांचा निर्धार अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहिला. विधवा, अनाथ, शोषित आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्य अर्पण केले. प्लेगग्रस्तांची सेवा करताना स्वतःचे प्राण अर्पण करून त्यांनी मानवसेवेचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे भारतीय सामाजिक परिवर्तनाचे दोन अविभाज्य स्तंभ आहेत. 

एका महापुरुषाचा गौरव करून दुसऱ्या महान समाजक्रांतिकारक व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे इतिहासाचे अपूर्ण दर्शन घडविणे होय. म्हणूनच महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचाही पूर्णाकृती पुतळा उभारणे ही केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून भारतीय स्त्रीशक्ती, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा गौरव ठरेल.

महानगरपालिकेने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा तातडीने उभारण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

या निवेदनावर आशा सुशील चिकटे, शोभाताई सोनकांबळे, सुजाता आजनिकर, निर्मला थोटे, शशिकला सुरवसे, निर्मला गौरकर, सरिता बनसोडे, मयुरी आल्टे, प्रणिता वाघमारे, मंगल कांबळे, कविता कदम, प्रतिभा कांबळे, शामल कांबळे, ललिता गायकवाड, प्रेमीला आपटे, शकुंतला नेत्रागावकर, बेबी कांबळे, मीना कदम, उदय सोनवणे, पांडुरंग अंबुलगेकर, मुकुंद वाघमारे, प्रा. विश्वनाथ आल्टे, ज्योतीराम लामतुरे, मिलिंद धावारे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या मागणीमुळे लातूरमध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारांना नव्याने उजाळा मिळाला असून, महानगरपालिका प्रशासन इतिहासाला न्याय देत सावित्रीबाईंच्या सन्मानाचा निर्णय कधी घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments