कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पर्यावरण संवर्धन रॅलीचे उत्साहात आयोजन भरत कोळी यावल (संपाद...
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पर्यावरण संवर्धन रॅलीचे उत्साहात आयोजन
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संदेश देण्यासाठी व्यास नगर परिसरात एक भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या काळात होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे, वृक्षसंवर्धन करणे आणि नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे फलक (पोस्टर्स) धरले होते. "झाडे लावा, झाडे जगवा", "पर्यावरण वाचवा, वसुंधरा वाचवा" अशा विविध पर्यावरणपूरक आणि प्रबोधनात्मक घोषणा देत विद्यार्थ्यांनी व्यास नगर आणि गल्ली परिसर पूर्णपणे दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या या उत्साही घोषणांमुळे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले गेले आणि परिसरात सकारात्मक वातावरण निर्मिती झाली.
याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. व्ही. पावरा, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. टी. वसावे आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रुपाली शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अर्जुन गाढे, प्रा. नरेंद्र पाटील आणि प्रा. अक्षय सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरणाप्रती आपली सामाजिक जबाबदारी ओळखून या रॅलीमध्ये महाविद्यालयातील एकुणात ४९ रा.से.यो. स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला. रॅलीच्या माध्यमातून व्यास नगर परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत मोलाचा संदेश पोहोचवण्यात राष्ट्रीय सेवा योजना विभागाला यश आले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून रा.से.यो. पथकाचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

No comments