शाळेच्या विकासासाठी निवृत्तीच्या शेवटच्या पगाराचा १ लाख ३७ हजार रुपयांचा धनादेश; मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे यांचा आदर्श उपक्रम हातेड...
शाळेच्या विकासासाठी निवृत्तीच्या शेवटच्या पगाराचा १ लाख ३७ हजार रुपयांचा धनादेश; मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे यांचा आदर्श उपक्रम
हातेड केंद्रातील शिक्षण परिषद उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व मार्गदर्शन
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हातेड येथील श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळेत आयोजित शिक्षण परिषद उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडली. यावेळी शाळेचे मा. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक श्री. पुरुषोत्तम विठ्ठलराव सोनवणे तसेच जि.प. प्राथमिक शाळा अनवर्दे-बुधगाव येथील मुख्याध्यापक श्री. रविंद्र महाजन यांना सेवावृत्तीच्या निमित्ताने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कार्यक्रमास चोपडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. अजितदादा पाटील, हातेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संदीपदादा बाविस्कर, पीएमश्री शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजीवदादा पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती कपिला पाटील यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच हातेड शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मुकेश सोनवणे, उपाध्यक्ष श्रीमती देवका जगन्नाथ सोनवणे आणि सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मा. मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे यांनी आपल्या सेवाकाळातील शेवटच्या महिन्याच्या पगाराचा तब्बल १ लाख ३७ हजार रुपयांचा धनादेश शाळेला अर्पण केला. शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी श्री. अजितदादा पाटील यांनी सांगितले की, अनेकजण मंदिर, धार्मिक व सामाजिक कार्यासाठी देणगी देतात; मात्र शाळेलाच ज्ञानमंदिर मानून आपल्या शेवटच्या पगाराची रक्कम शाळेसाठी देणे हा अत्यंत प्रेरणादायी आणि अनुकरणीय उपक्रम आहे. सोनवणे सरांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला असून, शाळेला दिलेले हे आर्थिक बळ निश्चितच शाळेला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
सोनवणे यांच्या या योगदानाबद्दल उपस्थित शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हातेड शाळेच्या शिक्षिका श्रीमती पल्लवी शिंदे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संदीप सनेर यांनी मानले.
शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर निरोप घेताना शाळेच्या विकासासाठी स्वतःच्या शेवटच्या पगाराची रक्कम देण्याचा निर्णय घेणारे पुरुषोत्तम सोनवणे यांचे कार्य शिक्षकांसह समाजासाठीही प्रेरणादायी ठरले आहे.



No comments