"चोपड्यात दूषित पाणीप्रश्नी विरोधक आक्रमक; दोषींवर कारवाईची जोरदार मागणी" चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज आम्ही...
"चोपड्यात दूषित पाणीप्रश्नी विरोधक आक्रमक; दोषींवर कारवाईची जोरदार मागणी"
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज आम्ही विरोधी पक्षातील नगरसेवक चोपडा शहरातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि जीवन-मरणाशी संबंधित प्रश्नावर जाब विचारत आहोत.
चोपडा नगरपरिषदेचे प्रशासन आणि सत्ताधारी नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ करत आहेत. शहरात अनेक दिवसांपासून गढूळ, दूषित आणि अस्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिक पाणीपट्टी भरतात, कर भरतात, पण त्याच्या बदल्यात त्यांना स्वच्छ पाणी नाही, तर आजार मिळत आहेत. हा जनतेवर झालेला अन्याय आहे.
आज आम्ही विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक अचानकपणे फिल्टर प्लांट ला भेट दिली तेथे बघितले की या
दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप, त्वचेचे विकार तसेच इतर जलजन्य आजारांचा धोका वाढल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. जर या निष्काळजीपणामुळे एखाद्या नागरिकाच्या जीवितास किंवा आरोग्यास हानी पोहोचली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी चोपडा नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची असेल.
आम्ही प्रशासनाला स्पष्ट प्रश्न विचारतो—
१) शहरात गढूळ पाणी का पुरवले जात आहे?
२) पिण्याच्या पाण्याची नियमित प्रयोगशाळेत तपासणी होते का?
३) तपासणीचे अहवाल जनतेपासून का लपवले जात आहेत?
४) नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे?
५) या गंभीर निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का झालेली नाही?
आमच्या ठाम मागण्या आहेत—
१) पाण्याची तात्काळ प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा.
२) दोषी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधितांवर कठोर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी.
३) शहरातील प्रत्येक नागरिकाला त्वरित स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
४) भविष्यात अशी वेळ पुन्हा येणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना जाहीर कराव्यात.
५) आरोग्य विभागामार्फत शहरात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवावी.
आज आम्ही प्रशासनाला शेवटचा इशारा देत आहोत. जनतेच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही.
जर तात्काळ ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही चोपडा शहरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू. त्या आंदोलनाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर राहील.
चोपड्याच्या जनतेला स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे. हा आमचा हक्क आहे, भीक नाही.
आजच्या या पत्रकार परिषदेत गटनेता व नगरसेवक गजेंद्र जैसवाल, नरेंद्र पाटील, सौ संध्या महाजन, डॉ रोहन पाटील, भूपेंद्र गुजराथी, सौ पूजा देशमुख, शरद पाटील, शकिलाबी बागवान उपस्थित होते
जय हिंद! जय महाराष्ट्र!

No comments