न्यायालयाची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाची गचांडी पकडून आरोपीची अरेरावी.. काल्पनिक फाईल फोटो सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमक...
न्यायालयाची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाची गचांडी पकडून आरोपीची अरेरावी.. 
काल्पनिक फाईल फोटो
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- न्यायालयाचा आदेश बजावण्यासाठी गेलेल्या खाकी वर्दीवर हात टाकण्याचे धाडस एका महाभागाला चांगलेच महागात पडले आहे."तुला एसपींसमोर उभा करतो, हिरो...असा दम भरत पोलिसांची थेट गचांडी पकडणाऱ्या संशयिताची पोलिसांनी क्षणात हवा काढली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.शेवगाव येथील फौजदारी न्यायालयाची एक नोटीस पती जयदेव किसन शिरसाठ याला बजावण्यासाठी त्याची पत्नी सूर्यकला शिरसाठ हिने अहिल्यानगर तालुका पोलिसांकडे दिली होती.नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्या आदेशानंतर पोलीस अंमलदार मंगेश खरमाळे यांनी जयदेवला फोन लावला. मात्र,मी कसलीही नोटीस घेणार नाही,” असा तोरा दाखवत जयदेवने थेट पोलिसांचाच फोन कट केला.अंमलदार मंगेश खरमाळे आणि बाबासाहेब गुंजाळ हे पंचांसह वाळुंज पारगाव शिवारातील त्याच्या घरी पोहोचले.घर बंद होते;पण तेवढ्यात जयदेव दुचाकीवरून तिथे दाखल झाला.खाकी वर्दीतील पोलिसांना पाहताच त्याचा पारा चढला.
"तुम्ही इथे कशासाठी आलात? तुला एसपींसमोर उभा करतो, हिरो!" अशी थेट दमबाजी त्याने पोलिसांना केली.एवढ्यावरच न थांबता त्याने थेट पोलीस अंमलदार खरमाळे यांच्या अंगावर धावून जात त्यांची गचांडी पकडली आणि अरेरावी सुरू केली.शासकीय कामात अडथळा आणत वर्दीवर हात टाकणाऱ्या या संशयिताला पोलिसांनी जागीच प्रतिकार करत ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले.पोलीस अंमलदार खरमाळे यांच्या फिर्यादीवरून जयदेव शिरसाठ विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments