चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या एल्गार चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : आदिवासी विकास विभागाने दि. ५ ऑगस्ट रोजी जारी...
चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या एल्गार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : आदिवासी विकास विभागाने दि. ५ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ चोपडा येथील आदिवासी मुला-मुलींच्या तिन्ही शासकीय वस्तीगृहांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्र येत तीव्र निषेध मोर्चा काढला. विश्रामगृह परिसरातून तहसील कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा देत पायी मोर्चा काढून आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला.
आदिवासी विकास विभागाने जारी केलेला शासन निर्णय वस्तीगृहात राहणाऱ्या तसेच नवीन प्रवेश घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या, निवासाच्या व संवैधानिक अधिकारांच्या दृष्टीने घातक ठरण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. हा निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगती, शिक्षण व संवर्धनाच्या अधिकारांवर गदा आणणारा असून, तो तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
विद्यार्थ्यांनी यावेळी आरोप केला की, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची मोठी गरज असताना शासनाच्या अशा निर्णयांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आदिवासी समाजाला भारतीय संविधानाने दिलेले हक्क, संरक्षण व शैक्षणिक अधिकार अबाधित ठेवण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
यावेळी गडचिरोली येथील आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेचाही तीव्र निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत शाळा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती काळजी घेतली असती, तर अशा घटना टाळता आल्या असत्या, अशी तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्यातील सर्व आश्रमशाळा व वस्तीगृहांमध्ये आरोग्य आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी करण्यात आली.
राज्यातील विविध भागांमध्येही या शासन निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलने सुरू असून, चोपडा येथील आदिवासी विद्यार्थ्यांनीदेखील या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत आपला निषेध नोंदविला. “आदिवासी विद्यार्थ्यांचे संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असा निर्धार विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. मोर्चानंतर झालेल्या सभेत ॲड. जमसिंग पावरा, युवराज बारेला, ॲड. प्रमोद बारेला (उप सरपंच, कर्जाणे), युवा आदिवासी सामाजिक कार्यकर्ते नामा पावरा, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष मुबारक तडवी तसेच विविध आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व वक्त्यांनी दि. ५ ऑगस्टच्या शासन निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही, अशी भूमिका मांडली.

No comments