घाडवेलमध्ये ७० ते ८० घरांचा वीजपुरवठा पंधरवड्यापासून विस्कळीत; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी अशोक कोळी चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
घाडवेलमध्ये ७० ते ८० घरांचा वीजपुरवठा पंधरवड्यापासून विस्कळीत; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी
अशोक कोळी चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
घाडवेल : गावातील वंचित घटकांच्या परिसरातील सुमारे ७० ते ८० घरांचा वीजपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठ्याची समस्या दीर्घकाळापासून कायम असूनही अद्याप कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे घरगुती कामांसह विद्यार्थी, लहान मुले तसेच पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील चार ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटना घडूनही वीजपुरवठ्याची समस्या पूर्णपणे दूर झालेली नाही. काही भागांतील मुख्य वीजवाहिन्यांबाबतही अडचणी निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
तसेच, समान वीजभार उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी काही भागांत वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत फेज आपोआप बंद होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे विद्युत यंत्रणेतील नेमकी अडचण काय आहे, याची तांत्रिक तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
स्थानिक पातळीवर वीजपुरवठ्याच्या देखभाल-दुरुस्तीबाबत योग्य समन्वय होत नसल्याची नाराजीही काही ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित वीज वितरण विभागाने तातडीने दखल घेऊन परिसरातील वीज यंत्रणेची सखोल तपासणी करावी, जळालेले ट्रान्सफॉर्मर व आवश्यक उपकरणांची दुरुस्ती किंवा बदल करावा आणि ७० ते ८० घरांचा वीजपुरवठा नियमित करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
वीजपुरवठा ही नागरिकांची मूलभूत गरज असून, परिसरातील नागरिकांना नियमित व सुरळीत वीज उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

No comments