वारकऱ्यांचे श्रद्धास्थान : श्री संत मुक्ताई पालखी सोहळा तापी पूर्णा तीर ते चंद्रभागा तीर भक्तीच्या आठवणींचा अविस्मरणीय पायी प्रवास मुक्ताई...
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान : श्री संत मुक्ताई पालखी सोहळा
तापी पूर्णा तीर ते चंद्रभागा तीर भक्तीच्या आठवणींचा अविस्मरणीय पायी प्रवास
मुक्ताईनगरच्या पावन भूमीतून श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचे पंढरपूरकडे होणारे प्रस्थान हा वारकऱ्यांसाठी अत्यंत भावनिक आणि मंगलमय क्षण असतो. “मुक्ताई माऊलीच्या जयघोषात” हजारो वारकरी, दिंड्या आणि भाविक या पायी वारीत सोहळ्यात सहभागी होतात. टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांचे सूर, हरिनामाचा गजर आणि सेवाभावी भाविकांची साथ यामुळे संपूर्ण पालखी मार्ग भक्तिमय होऊन जातो.
मुक्ताईनगरपासून पंढरपूरपर्यंतचा पायी प्रवास म्हणजे अनेक गावांच्या, मुक्कामांच्या आणि भक्तीपूर्ण आठवणींची साठवण आहे. कुठे ग्रामस्थांकडून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत, कुठे वारकऱ्यांसाठी अन्नदान व पाण्याची व्यवस्था, तर कुठे भजन-कीर्तन आणि हरिनाम सप्ताह—प्रत्येक ठिकाणी माणुसकी आणि भक्तीचा अनुभव येतो. थकलेल्या वारकऱ्यांना मिळणारी प्रेमाची सेवा त्यांच्या प्रवासातील अविस्मरणीय आठवण बनते.
पंढरपूरच्या पावन भूमीत पालखीचे आगमन होताच वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण येते. वखारी येथे संत ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव आणि इतर संतांच्या पालखी-परंपरांशी होणारी भेट हा या सोहळ्यातील अत्यंत भावस्पर्शी प्रसंग आहे. संतबंधाच्या स्मृती जपणाऱ्या या परंपरेत मुक्ताई माऊलीला साडी-चोळीची भेट अर्पण करण्याचा मानाचा प्रसंगही भक्तिभावाने अनुभवला जातो.
त्यानंतर भगवान पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी माथा टेकवून वारकरी आपल्या वारीचे सार्थक मानतात. पंढरपूरच्या विठ्ठलदर्शनाचा आनंद मनात साठवून पालखी पुन्हा गुरु पौर्णिमेच्या काल्याच्या कीर्तनानंतर मुक्ताईनगरच्या दिशेने प्रस्थान करते.परतीचा प्रवासही तितकाच भावपूर्ण असतो. पंढरपूरच्या विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन निघालेली पालखी प्रत्येक गावातून पुढे सरकत असताना वारकऱ्यांच्या मनात ओढ “आता आपल्या मुक्ताई माऊलीच्या घरी परतायचे” हा आनंद असतो. वाटेतील स्वागत, दिंड्यांचा उत्साह, अभंग-भजन आणि नामस्मरणाच्या आठवणी मनात कायमच्या कोरल्या जातात.
अखेर पालखी मुक्ताईनगरच्या पावन भूमीत श्रावण नागपंचमीच्या दिवशी दाखल होते, तेव्हा हजारो भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात. संपूर्ण खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेश परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत मुक्ताई नवीन मंदिर ते जुने मंदिर कोथळी पालखी आगमन सोहळा सुरू होतो. सोहळ्यामध्ये भाविकांच्या उस्फूर्त प्रतिसादात फुलांची उधळण, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मुक्ताईनगर यांच्याकडून रांगोळी सजावट, ठिकठिकाणी दीपप्रज्वलन, फराळ वाटप, टाळ-मृदंग आणि “मुक्ताई माऊली की जय”च्या जयघोषाने दिंडी सोहळ्यात संपूर्ण परिसरातून शेकडो दिंड्या सहभागी होऊन संपूर्ण मुक्ताईनगर परिसर भक्तिमय होतो.
म्हणूनच मुक्ताईनगर ते पंढरपूर आणि पंढरपूर ते मुक्ताईनगर हा पायी पालखी सोहळा केवळ पायी प्रवास नाही. हा प्रवास आहे श्रद्धेचा, भक्तीचा, त्यागाचा, सेवाभावाचा, संतपरंपरेचा आणि माणुसकीच्या नात्यांचा. वाटेत भेटलेली माणसे, मिळालेली सेवा, अनुभवलेला नामगजर, वखारीतील संतपालख्यांची भेट, विठ्ठलाचे दर्शन आणि मुक्ताईच्या भूमीत झालेले पुनरागमन या सर्व आठवणी प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात सदैव जिवंत राहतात.
“पंढरीचा परमात्मा विठ्ठल आणि आदिशक्ती मुक्ताई माऊली—या दोन पवित्र श्रद्धास्थानांना जोडणारी ही वारी म्हणजे तापी पूर्णा तीर ते चंद्रभागा तीर अशी
भक्तीच्या अखंड प्रवाहाची अनुभूती आहे.”
लेख:- शिवाजीराव भागवत वंजारी
उपशिक्षक
जे.ई.स्कूल,मुक्ताईनगर


No comments