adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तरसोद–फागणे बायपास महामार्गाच्या निकृष्ट कामावर मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा आक्रमक पवित्रा; उच्चस्तरीय चौकशीसह ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी

  तरसोद–फागणे बायपास महामार्गाच्या निकृष्ट कामावर मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा आक्रमक पवित्रा; उच्चस्तरीय चौकशीसह ठेकेदाराला ब्लॅकलिस...

 तरसोद–फागणे बायपास महामार्गाच्या निकृष्ट कामावर मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा आक्रमक पवित्रा; उच्चस्तरीय चौकशीसह ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी 


जळगाव प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

तरसोद ते फागणे बायपास महामार्गावरील कथित निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गट यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. संबंधित महामार्गाच्या कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत) टाकावे, तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, तरसोद ते फागणे बायपास महामार्ग हा उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय मार्ग असून या मार्गावर अवजड व प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच लोहमार्ग क्रॉसिंग असल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि टिकाऊपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला असून, कामात आवश्यक तांत्रिक निकष, गुणवत्तेची मानके आणि करारातील अटींचे पालन करण्यात आले नसल्याची गंभीर शंका व्यक्त करण्यात आली आहे. 


या निकृष्ट कामामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात या रस्त्यावर अपघात अथवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार व कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात यावी. रस्त्याच्या गुणवत्तेची प्रयोगशाळेत तपासणी करून काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच संबंधित ठेकेदाराला शासनाच्या सर्व प्रकारच्या निविदा प्रक्रियेतून कायमस्वरूपी अथवा नियमानुसार अपात्र घोषित करून त्याचा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करावा, तसेच कामाची देखरेख करणारे अभियंते, अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी, शिस्तभंगाची कारवाई आणि आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच सक्षम न्यायालय आणि संबंधित वैधानिक प्राधिकरणांकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, उपतालुकाध्यक्ष शैलेश चौधरी, राहुल चव्हाण, सुनील सोनवणे, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळ, चेतन पाटील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाचे उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, प्रमोद सोनवणे, गणेश पाटील, प्रेमराज राठोड, किरण ठाकूर, लोटन सोनवणे, राजेंद्र पाटील यांच्यासह मनसे व ठाकरे सेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments