गोंधवणी रोड पाटाच्या पुलाजवळील रस्त्यालगत वाढलेले गवत काढण्याची मागणी ; गवतामुळे डास व अन्य किटकांचा वाढता प्रादुर्भाव; नागरिकांच्या आरोग...
गोंधवणी रोड पाटाच्या पुलाजवळील रस्त्यालगत वाढलेले गवत काढण्याची मागणी ; गवतामुळे डास व अन्य किटकांचा वाढता प्रादुर्भाव; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर परिसर स्वच्छ करण्याची मागणी
श्रीरामपूर / प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोडवरील पाटाच्या पुलाजवळ, कलगीधर हॉल परिसरासह रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
वाढलेल्या गवतामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, डास व अन्य कीटकांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नगर पालिका प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन सदरील ठिकाण चे गवत काढण्याची कार्यवाही करावी अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.
डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिसरातील नागरिक झाले त्रस्त
पाटाच्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला वाढलेल्या गवतामुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच थंडी-तापासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त असताना डासांचा प्रादुर्भाव वाढल्यास विविध आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर वाहतूक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पाहणी करून तातडीने गवत काढण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर तातडीची आवश्यकता
येत्या बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी हजरत मुहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने येथील सय्यदबाबा चौक येथून निघणाऱ्या मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी संजयनगर, मिल्लतनगर, फातेमा हौसिंग सोसायटी, गोंधवणी आदी ठिकाणी च्या छोट -छोट्या मिरवणूका गोंधवणी रोडवरुनच मार्ग क्रमण करत असतात,या मिरवणुकांसोबत नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते,
या मिरवणुकांमध्ये वृद्ध, तरुण, बालके तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे गोंधवणी रोड पाटाच्या पुलाजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेले गवत, अस्वच्छता व डासांचा प्रादुर्भाव यामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे.
मिरवणुकीपूर्वी संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा गैरसोय होऊ नये यासाठी पूर्वतयारी म्हणून गोंधवणी रोडवरील पाटाच्या पुलाजवळील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत तातडीने काढावे. स्वच्छता करावी तसेच मिरवणूक मार्ग व परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेला घाण - कचरा,गवत साफ करून संपूर्ण भागाची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नगर पालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तसेच आगामी धार्मिक मिरवणुकीचा विचार करता नगर पालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. संबंधित विभागाला तातडीने सूचना देऊन गवत काढणे, परिसरातील कचरा हटविणे, आवश्यक ठिकाणी स्वच्छता करणे आणि डास प्रतिबंधक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गोंधवणी रोडवरील पाटाच्या पुलाजवळील परिसराची तातडीने पाहणी करून आवश्यक स्वच्छता व गवत काढण्याची कार्यवाही करण्यात यावी यासोबतच दशमेश चौक, मौलाना आझाद चौक समवेत काझीबाबा रोड पश्चिम भाग येथील मुख्य मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरील तात्काळ खड्डे बुजवावी,अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर – 9561174111


No comments