शिवराणा ब. प्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे १००१ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवा...
शिवराणा ब. प्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे १००१ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून शिवराणा ब. प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवगड तांडा येथे १००१ वृक्षारोपण अभियान मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आले. प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा. छायाताई विजयसिंह महेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जागतिक तापमानवाढ, वाढते प्रदूषण, कमी होत चाललेले वनक्षेत्र आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल लक्षात घेऊन या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औषधी, फळझाडे, सावली देणारी तसेच पर्यावरणपूरक विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करण्याची सामूहिक शपथही उपस्थितांनी घेतली.
यावेळी "झाडे लावा... झाडे जगवा..." हा संदेश देत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त वातावरण मिळावे, यासाठी प्रत्येकाने आपल्या वाढदिवस, स्मृतिदिन किंवा विशेष प्रसंगी किमान एक तरी वृक्ष लावावा आणि त्याची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.
या उपक्रमात शिवराणा ब. प्रतिष्ठानचे सचिव मा. विजयसिंह महेर, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, युवक-युवती तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले. सर्वांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा. छायाताई विजयसिंह महेर म्हणाल्या की, "वृक्ष हेच पृथ्वीचे खरे जीवन आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन केले, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल. सामाजिक कार्याबरोबरच पर्यावरण संरक्षणासाठी शिवराणा ब. प्रतिष्ठान सातत्याने जनजागृती करत राहील. भविष्यातही समाजोपयोगी, पर्यावरणपूरक आणि लोकहिताचे विविध उपक्रम राज्यभर राबविण्यात येतील."
या अभियानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी शिवराणा ब. प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. पर्यावरण रक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


No comments