adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी    अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकाप...

शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी  


 अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर, नांदुरा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतीपंपांना सध्या सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी विहीर सिंचनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळेत एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर कृषीपंप सुरू होत असल्याने वीजवाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात लोड येत असून, अनेक भागांत तब्बल २ ते ३ तास वीजपुरवठा कमी दाबाने अर्थात ‘लाईट ड्रॉप’ होत असल्याची समस्या निर्माण झाली आहे.

या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येत नसून, शेतीपिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याचे सध्याचे वेळापत्रक तत्काळ बदलण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेने प्रशासनाकडे सकाळी ६ ते १२ आणि सायंकाळी पुन्हा स्वतंत्र वेळेत शेतीपंपांना वीजपुरवठा करण्याचे वेळापत्रक लागू करावे, अशी मागणी केली आहे. अथवा सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत सलग वीजपुरवठा करण्यात यावा, अशी पर्यायी मागणीही करण्यात आली आहे.

पावसाअभावी शेतकऱ्यांची सर्व मदार विहिरीच्या पाण्यावर असताना वीजपुरवठ्यातील कमी दाबाची समस्या कायम राहिल्यास पिकांना पाणी देणे कठीण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीची तातडीने दखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव, हरणखेड शाखाध्यक्ष विश्वास होले, संदीप खाचणे, वैभव करांडे, कृष्ण पाटील, गणेश इंगळे, मयुर होले, हर्षल खाचणे, कृष्णा राणे, अभिजित पाटील, किसना खाचणे, तेजस वसतकार, रवींद्र राणे, चेतन खाचणे, राहुल इंगळे, राहुल वराडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

No comments