शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लामजना पाटी येथे रास्ता रोको आंदोलन! कर्जमाफी, पीकविमा अनुदान आणि हेक्टरी ५० हजारांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांचा एल्ग...
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लामजना पाटी येथे रास्ता रोको आंदोलन!
कर्जमाफी, पीकविमा अनुदान आणि हेक्टरी ५० हजारांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; रास्ता रोकोने प्रशासनाचे वेधले लक्ष.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लामजना पाटी, ता. औसा : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने व शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २३ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, लामजना पाटी येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शासनाविरोधात जोरदार आवाज उठवला.
“पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा; शेतकरी आणि शेतमजूर म्हणून एकत्र या,” असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.या आंदोलनात
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, मागील थकीत पीकविम्याची रक्कम तातडीने अदा करावी आणि एक रुपयाची चार ट्रिगर असलेली पीकविमा योजना लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले १७ हजार ५०० रुपयांचे विमा स्वरूपातील अनुदान तातडीने वितरित करावे, तसेच यंदा पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कोअर कमिटी सदस्य राजेंद्रआबा मोरे यांच्यासह सत्तार पटेल, अरुणदादा कुलकर्णी, रूपेश शंके, प्रज्योत हुडे, कल्याणअप्पा हुरदळे, बालाजी जाधव, विवेक पाटील, शिवाजी पाटील, बालाजी सूर्यवंशी, आकाश पाटील, शाहुराज कांबळे, सतीष सोळंके, वसंत कंदगुळे, विलास काळे सर, दीपक कंदगुळे, प्रविण काळे, शुभम डोंगरे, संदिपान पवार, दत्ता किनीकर, इमाम सय्यद, गौतम कांबळे, विशाल ढोबळे, दिगांबर कर्वे, श्रीराम चलवाड आणि बालाजी तात्या शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


No comments