खामगावात ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात ठिकठिकाणी पाणी, शरबत व मिठाईचे वाटप पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामग...
खामगावात ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात
ठिकठिकाणी पाणी, शरबत व मिठाईचे वाटप
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव शहरात २६ ऑगस्ट २०२६ रोजी ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. अब्दुल शकूर तेली यांच्या घरासमोर मिठाईचे वितरण करून अब्दुल हमीद चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
मिरवणूक अब्दुल हमीद चौकातून निघून मस्तान चौक, जुना फैल, मरकज मशीद, डॉक्टर छाजेड हॉस्पिटल, शहरयार खान मास्टर यांच्या गल्लीमार्गे बीफ मार्केट, तेलीपुरा, फाटकपुरा आणि अंजुमन मदरसा परिसरातून मार्गक्रमण करत पुन्हा अब्दुल हमीद चौकात पोहोचली.
मिरवणुकीचे मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांकडून फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलांसह मुस्लिम बांधवांना विविध ठिकाणी पाणी, शरबत आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मार्गावर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीत तरुणांसह ज्येष्ठ मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नात शरीफचे लाऊडस्पीकरच्या माध्यमातून पठण करण्यात येत होते. ईद-ए-मिलादुन्नबीचा संदेश देत मुस्लिम बांधवांनी मोठ्या आनंदात हा धार्मिक उत्सव साजरा केला.
दरम्यान, मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरवणूक पुन्हा अब्दुल हमीद चौकात पोहोचल्यानंतर हाफीज सरफराज खान यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला.

No comments