दिग्गजांच्या बालेकिल्ल्यात मंदाताई चांभारे पाटील यांची दमदार लढत; उल्लेखनीय ६०७ मतांसह लक्षवेधी कामगिरी! अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:...
दिग्गजांच्या बालेकिल्ल्यात मंदाताई चांभारे पाटील यांची दमदार लढत; उल्लेखनीय ६०७ मतांसह लक्षवेधी कामगिरी!
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलढाणा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महिला राखीव मतदारसंघातील निवडणुकीत चांभारे-पाटील मंदाकिनी रमेशराव यांनी स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत उल्लेखनीय मते मिळवत उपविजेतेपद मिळवले. जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे प्रभावक्षेत्र असतानाही सौ. मंदाताईंनी मिळवलेली मतसंख्या त्यांच्या संघर्षाची, मतदारांशी असलेल्या थेट संपर्काची आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीची प्रचिती देणारी ठरली.
या निवडणुकीत केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या मेहकर-लोणार परिसरासह, माजी मंत्री राजेंद्रजी शिंगणे यांच्या देऊळगाव राजा व सिंदखेडराजा परिसरात, तसेच महाराष्ट्राचे राज्यमंत्री आकाशदादा फुंडकर यांच्या खामगाव-शेगाव भागात आणि आ. चैनसुखजी संचेती यांच्या मलकापूर-नांदुरा परिसरात मोठ्या राजकीय ताकदीचे वातावरण होते.
याशिवाय आ. श्वेताताई महाले यांच्या चिखली मतदारसंघात आणि आ. संजयजी गायकवाड यांच्या बुलढाणा-मोताळा परिसरातही प्रभावी राजकीय समीकरणे होती. अशा विविध दिग्गजांच्या प्रभावक्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय अजित दादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सौ. मंदाताईंनी स्वतःच्या संपर्कावर, कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीवर आणि मतदारांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवली.
विशेष म्हणजे, निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत सौ. मंदाताईंनी न डगमगता जिल्ह्यातील विविध भागांत संपर्क साधत शेतकरी, सहकार आणि सर्वसामान्य मतदारांच्या प्रश्नांशी आपली भूमिका जोडली. मर्यादित साधनसामग्रीच्या तुलनेत मोठ्या राजकीय ताकदींशी दिलेला हा संघर्ष आणि त्यातून मिळवलेली मतसंख्या समर्थकांच्या दृष्टीने निश्चितच समाधानकारक व उत्साहवर्धक मानली जात आहे.
स्व. अजितदादा पवार यांच्या शेतकरी हिताच्या आणि सहकार बळकटीकरणाच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून उभ्या राहिलेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलला मिळालेला हा प्रतिसादही या निवडणुकीतील महत्त्वाचा पैलू ठरला. मंदाताईंच्या माध्यमातून पॅनलने महिला प्रतिनिधित्व, शेतकरी हित आणि सहकारातील परिवर्तनाचा मुद्दा मतदारांसमोर प्रभावीपणे मांडला.
“पराभव हा शेवट नसतो; संघर्षातूनच पुढील विजयाची पायाभरणी होते,” या भावनेतून मंदाताईंच्या या लढतीकडे पाहिले जात असून, त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी एक मजबूत आधार निर्माण झाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. मंदाताईंच्या या संघर्षाला मतदारांनी दिलेला प्रतिसाद, कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि स्वर्गीय अजित दादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून मांडलेला परिवर्तनाचा विचार यामुळे ही निवडणूक त्यांच्या राजकीय वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. लढत संपली आहे; पण संघर्षाची सुरुवात झाली आहे मंदाताईंच्या या दमदार लढतीने आगामी राजकीय वाटचालीची नवी दिशा निश्चित केली आहे.

No comments