उदगीर-निलंगा मार्गावरील लालपरीचे वेळापत्रक कोलमडले; विद्यार्थी, महिला व प्रवाशांचे हाल. दोन-दोन तास लालपरी गायब,परतीच्या बस अभावी मुलींच्या...
उदगीर-निलंगा मार्गावरील लालपरीचे वेळापत्रक कोलमडले; विद्यार्थी, महिला व प्रवाशांचे हाल.
दोन-दोन तास लालपरी गायब,परतीच्या बस अभावी मुलींच्या शिक्षणावर परिणाम
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वलांडीः-उदगीर-देवणी-वलांडी-धनेगाव-अंबुलगा-लांबोटा-नि लिंगा या राज्य मार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने हजारो प्रवाशांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळेवर बस न मिळाल्याने विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, भाजी विक्रेते, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असून निलंगा आगाराच्या कारभाराविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या मार्गावर दररोज अंदाजे ८ ते १० हजार प्रवासी प्रवास करतात. सकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि व्यावसायिकांची मोठी वर्दळ असते. या मार्गावरील बहुतांश बस निलंगा आगाराच्या असून उदगीर आगारातून केवळ पाच-सहा बस धावतात. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक बस नियोजित वेळेला येतच नाहीत, तर काही बस तासन्? तास उशिरा येतात. परिणामी एका बसमध्ये प्रचंड गर्दी होत असून अनेकदा वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत आहेत. वेळेवर बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत आहे.
उच्च शिक्षणासाठी वलांडी, देवणी, धनेगाव व परिसरातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना दररोज उदगीर किंवा निलंगा येथे जावे लागते. मात्र परतीची बस वेळेवर मिळत नसल्याने विशेषतः मुलींना रात्री उशिरा घरी परतावे लागत आहे. सुरक्षिततेच्या चिंतेमुळे काही पालकांनी मुलींचे शिक्षणच थांबविल्याची खंत व्यक्त केली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शहरात खोली करून ठेवणे शक्य नसल्याने अनेक कुटुंबे एसटीवरच अवलंबून आहेत; मात्र अनियमित बससेवेमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येत असल्याचे पालकांनी सांगितले.
उदगीर आगारात बसबाबत चौकशी केल्यास' त्या बस निलंगा आगाराच्या आहेत, तेथे संपर्क साधा,' असे सांगितले जाते. दरम्यान, या समस्येबाबत निलंगा आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. प्रवाशांनी निलंगा आगाराने बससेवा वेळापत्रकानुसार नियमित चालवावी, वाहक-चालकांवरील नियंत्रण वाढवावे, बस फेऱ्यांचे काटेकोर नियोजन करावे आणि या मार्गावरील विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी केली आहे. या मार्गावरील ढिसाळ नियोजनाचा कळस गाठला असून अनेकदा दोन-दोन तास एकही बस येत नाही. त्यानंतर एकाच वेळी तीन-चार बस येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका बसत असल्याची प्रतिक्रिया नियमित प्रवासी उत्तमराव हुडे (कवठाळकर) यांनी व्यक्त केली.

No comments