adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आगामी गाळप हंगामात मांजरा ऊसाला अधिक भाव देणार : दिलीपराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; कर्मचाऱ्यांना १० टक्के दिवाळी बोनस जाहीर

  आगामी गाळप हंगामात मांजरा ऊसाला अधिक भाव देणार : दिलीपराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; कर्...

 आगामी गाळप हंगामात मांजरा ऊसाला अधिक भाव देणार : दिलीपराव देशमुख

मांजरा सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; कर्मचाऱ्यांना १० टक्के दिवाळी बोनस जाहीर 


उत्तम माने लातूर जि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) लातूर शहरातील पार्वती मंगल कार्यालय येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख होते.

यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की, विकासरत्न विलासराव देशमुख आणि बब्रुवानजी काळे यांनी सुमारे चार दशकांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज महावृक्षात रूपांतर झाले आहे. मांजरा परिवाराने नेहमीच शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा. गाळप झालेल्या उसासाठी ३ हजार १७७ रुपये प्रतिक्विंटल बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून, आगामी गाळप हंगामातही ऊसाला अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 


जिल्हा बँक आणि साखर कारखान्यांमुळे ‘लातूर पॅटर्न’चे वेगळेपण

साखर कारखाने आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षम व्यवस्थापनामुळे लातूर पॅटर्नचे वेगळेपण दिसून येत असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. हार्वेस्टर चालकांनी घेतलेल्या कर्जाचे यावर्षीचे तसेच पुढील वर्षाचे हप्तेही बँकेला अदा केले आहेत. केवळ कारखाने नफ्यात असणे पुरेसे नसून, लातूर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

काम करताना टीका होत असते; मात्र त्याला उत्तर शब्दांनी नव्हे तर आपल्या कामातून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना १० टक्के दिवाळी बोनस

मांजरा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी सभेत दिलीपराव देशमुख यांनी १० टक्के दिवाळी बोनस जाहीर केला. ही घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 


‘मांजरा’ साहेबांसाठी जीव की प्राण : अमित देशमुख

माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी चार दशकांपूर्वी मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यांनी उभे केलेले कार्य सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी पुढे नेले आहे. मांजरा साखर कारखाना लोकनेते विलासराव देशमुख यांच्यासाठी जीव की प्राण होता.

मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने शिस्तबद्ध आणि काटेकोर नियोजनातून कार्यरत आहेत. या कारखान्यांची शंभर टक्के यांत्रिकीकरणाकडे वाटचाल सुरू असून इथेनॉल, वीज, बायोगॅस, ऑक्सिजन निर्मितीसह अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. साखर कारखानदारीतील विविध पुरस्कार व सन्मान या कारखान्यांनी मिळवले असून, मांजरा परिवाराच्या कार्यपद्धतीचा इतर कारखानेही आदर्श घेत आहेत, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

पाच वर्षांत १० हजार तरुणांना रोजगार : धीरज देशमुख

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर मिळावे, यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी गेल्या पाच वर्षांत १० हजार तरुणांच्या हाताला रोजगार दिला आहे. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांमुळे दरवर्षी सुमारे २२ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असून, पाच वर्षांत केंद्र शासनाला सुमारे १०० कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. शेतकरी ताठ मानेने जगला पाहिजे, यासाठी मांजरा परिवार सातत्याने काम करत असल्याचे धीरज देशमुख यांनी सांगितले.

सभासदांकडून सर्व विषयांना मंजुरी

सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव काळे यांनी केले. कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी सभेतील विषयांचे वाचन केले. मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली.

यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव काळे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील यांच्यासह मांजरा परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक कैलास पाटील यांनी केले.

No comments