अंधाराचा फायदा...शेळ्यांची चोरी अन् थेट पुण्याच्या मटण दुकानात 'सौदा'..LCB च्या तपास पथकाची 'फिल्डिंग' अन् केडगाव बायपासला...
अंधाराचा फायदा...शेळ्यांची चोरी अन् थेट पुण्याच्या मटण दुकानात 'सौदा'..LCB च्या तपास पथकाची 'फिल्डिंग' अन् केडगाव बायपासला आरोपींचा आवळल्या मुसक्या!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- रात्रीच्या वेळी हायवेवरून भरधाव धावणारी एक 'सुमो गोल्ड' गाडी... गाडीच्या मागील भागात बांधलेल्या शेळ्या...आणि पुण्यातल्या मटण विक्रेत्यांशी थेट 'कनेक्शन'! अहिल्यानगर जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात शेळ्या-बोकड चोरी करून दहशत पसरवणाऱ्या एका भयंकर टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे.केडगाव बायपास येथे स्थानिक गुन्हे शाखेने रचलेल्या जाळ्यात ही टोळी अलगद अडकली.या कारवाईत पोलिसांनी १०,१३,००० रुपये (दहा लाख १३ हजार) किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तब्बल १२ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना ३१ जुलै २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,चोरीच्या शेळ्या घेऊन काही जण चारचाकी वाहनाने केडगाव बायपास येथे येणार आहेत.माहिती मिळताच पोनि.संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये पोलीस अंमलदार शाहीद शेख,फुरकान शेख, प्रशांत राठोड,सागर ससाणे, रोहित येमुल,सतीष भवर आणि बाळासाहेब गिरी यांचा समावेश होता.या पथकाने केडगाव बायपासवर सापळा रचला.काही वेळातच एक संशयित टाटा सुमो गोल्ड (क्रमांक MH-12-JB-0171) तिथे आली.पोलिसांनी गाडी थांबवून पंचांसमक्ष झडती घेतली असता मागील बाजूला चोरीच्या शेळ्या आढळून आल्या.पोलिसांनी तात्काळ गाडीतील चौघांना ताब्यात घेतले.ओमकार सुधाकर परंवार (वय २७, रा. खडकी बाजार, पुणे),शहाबाज सिराज कुरेशी (वय २६, रा. येरवडा, पुणे),सक्षम विवेक भोर (वय १९, रा. गांधीनगर, पिंपरी, पुणे),अरबाज रशीद कुरेशी (वय २६, रा. येरवडा, पुणे) असे पकडलेल्या आरोपींची नावेआहेत.पकडलेल्या गाडीतून ३५ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल,२८ हजार रुपये किमतीच्या ३ शेळ्या व १ बोकड, आणि ९ लाख रुपयांची टाटा सुमो गोल्ड गाडी असा एकूण ९,६३,००० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच जप्त करण्यात आला.ताब्यात घेतलेला आरोपी शहाबाज सिराज कुरेशी याच्याकडे कसून चौकशी केली असता,त्याने या शेळ्या संगमनेर तालुक्यातील पळसखेडे गावातून चोरी केल्याची कबुली दिली.अधिक तपासात या टोळीने अहिल्यानगर,श्रीगोंदा, संगमनेर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC परिसरात शेळ्या-बोकड मारल्याचे समोर आले.चोरी केलेल्या शेळ्या त्यांनी पुण्यातील विविध मटण विक्रेत्यांना कत्तल करण्यासाठी विकल्या होत्या.इरफान फकिरमहंमद कुरेशी (वय ३९, रा. लोणी काळभोर, पुणे) - याने विकत घेतलेल्या शेळ्या दुकानात कत्तल करून मांस विकले होते.त्याच्याकडून ५०,००० रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आरोपींनी संगमनेर तालुका (४ गुन्हे), नगर तालुका (२ गुन्हे), घारगाव (३ गुन्हे), श्रीगोंदा (२ गुन्हे), बेलवंडी (१ गुन्हा) आणि रांजणगाव MIDC (१ गुन्हा) अशा एकूण १२ ठिकाणच्या चोरीची कबुली दिली आहे.सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत दाखल आहेत.सध्या ताब्यात घेतलेल्या आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या (गु.र.नं. ४०८/२०२६) स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत आहेत.

No comments