गणेशोत्सवात ‘कमी आवाज, निरोगी जीवन’चा संदेश; चोपडा शहर पोलिसांना विद्यार्थ्यांनी पाठवले पोस्टकार्ड अशोक कोळी चोपडा (संपादक हेमकांत गाय...
गणेशोत्सवात ‘कमी आवाज, निरोगी जीवन’चा संदेश; चोपडा शहर पोलिसांना विद्यार्थ्यांनी पाठवले पोस्टकार्ड
अशोक कोळी चोपडा
(संपादक हेमकांत गायकवाड)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या वतीने “कमी आवाज, निरोगी जीवन” हा जनजागृतीपर संदेश देण्यात आला आहे. या उपक्रमाला प्रतिसाद देत महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, चोपडा येथील सुमारे १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पोलीस निरीक्षक चोपडा शहर यांना पोस्टकार्डद्वारे संवेदनशील संदेश पाठवला.
गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत कर्कश डीजेचा वापर टाळावा, मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण कमी करावे, तसेच गुलालाऐवजी फुलांचा वर्षाव करून पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.
“बाप्पा आनंदाचा... त्रासाचा नाही!” या भावनेतून विद्यार्थ्यांनी लहान मुले, वृद्ध व्यक्ती तसेच नागरिकांना गुलाल, डीजे व वाजंत्रीच्या मोठ्या आवाजाचा होणारा त्रास लक्षात घेऊन गणेश मंडळांनी सामाजिक भान जपावे, असा संदेश दिला.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून गणेशोत्सव आनंदासोबतच शांतता, सामाजिक संवेदनशीलता आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे.


No comments