फेसर्डी गावासाठी स्वतंत्र स्वस्त धान्य दुकानाची मागणी; मनसेचे प्रदीप पाटील यांचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन जळगाव प्रतिनिधी (संपादक...
फेसर्डी गावासाठी स्वतंत्र स्वस्त धान्य दुकानाची मागणी; मनसेचे प्रदीप पाटील यांचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : जळगाव तालुक्यातील फेसर्डी गावासाठी स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
फेसर्डी गावाची लोकसंख्या सुमारे ५०० असून, गावात अद्याप स्वतंत्र स्वस्त धान्य दुकानाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत मिळणारे तांदूळ, गहू व इतर जीवनावश्यक धान्य घेण्यासाठी ग्रामस्थांना जवळपास ५ किलोमीटर अंतरावरील नंदगाव येथे जावे लागत आहे.
या गैरसोयीचा सर्वाधिक फटका गरीब कुटुंबे, शेतमजूर, रोजंदारीवर काम करणारे नागरिक, महिला, वयोवृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांना बसत आहे. धान्य घेण्यासाठी नंदगावपर्यंत ये-जा करताना नागरिकांना अतिरिक्त वेळ आणि प्रवासाचा खर्च सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
फेसर्डी गावाची लोकसंख्या, लाभार्थ्यांची संख्या तसेच नंदगाव येथील स्वस्त धान्य दुकानाचे अंतर लक्षात घेता गावासाठी स्वतंत्र दुकानाची नितांत आवश्यकता असल्याचे मनसेने म्हटले आहे.
त्यामुळे प्रशासनाने फेसर्डी गावाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक चौकशी करावी आणि शासनाच्या नियमानुसार स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, प्रदीप पाटील आणि राजेंद्र निकम उपस्थित होते.

No comments