मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये एकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! उदगीर-लातूर महामार्गावर मृतदेहासह गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मराठा आरक्षणाच...
मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये एकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
उदगीर-लातूर महामार्गावर मृतदेहासह गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात पेटलेला वणवा अधिकच तीव्र झाला असून, लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर
लातूर, जि. प्र (उत्तम माने )
(संपादक : हेमकांत गायकवाड)
निलंगा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात पेटलेला वणवा अधिकच तीव्र झाला असून, लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. "मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझे जीवन संपवत आहे," अशी चिठ्ठी लिहून शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथील सुनील विनायक बिरादार (वय ४२) या मराठा बांधवाने पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली असून, संतप्त गावकरी आणि नातेवाईकांनी उदगीर-लातूर मुख्य रस्त्यावर येथे मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुमठाणा येथील सुनील बिरादार यांनी गावातीलच विहिरीत उडी घेतली. (Maratha Reservation Suicide) घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला असता, त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट आढळली. त्यात त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देत असल्याचे नमूद केले होते.
मुख्य रस्त्यावर मृतदेह ठेवून आंदोलन...
मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी प्रशासकीय दिरंगाईविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. गावकऱ्यांनी मृतदेह थेट उदगीर-लातूर मुख्य महामार्गावर आणून ठेवला आणि वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. मयत सुनील बिरादार यांच्या कुटुंबातील एका सदस्याला तात्काळ शासकीय सेवेत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन द्यावे. मराठा समाजाला सरसकट कुणबी/जात प्रमाणपत्र वाटप करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लेखी द्यावे. जोपर्यंत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी येऊन मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.
अंंतरवली सराटीतील उपोषणाचे पडसाद; वातावरणात कमालीचा तणाव
गेल्या ११ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे (Maratha Reservation Suicide) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आधीच मराठा समाज आक्रमक झालेला असताना, लातूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

No comments