ई-पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मोठी सुविधा; शेतकऱ्यांच्या मोबाईलवरूनच करता येणार पिकांची नोंद ( ई-पीक पाहणी न केल्यास पिक विमा व अनुदान मिळणा...
ई-पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मोठी सुविधा; शेतकऱ्यांच्या मोबाईलवरूनच करता येणार पिकांची नोंद
( ई-पीक पाहणी न केल्यास पिक विमा व अनुदान मिळणार नाही ; शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी - तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी )
विकास पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ‘ई-पिक पाहणी (DCS MH)’ ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद मोबाईलवरून स्वतः करता येणार आहे. खरीप हंगाम २०२६ साठी ई-पिक पाहणीचा कालावधी ११ ऑगस्ट २०२६ ते १० नोव्हेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.
डिजिटल क्रॉप सर्व्हे महाराष्ट्र (DCS MH) या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातील पिकांची माहिती ऑनलाइन नोंदवू शकतात. यासाठी मोबाईलमध्ये DCS MH ॲप डाउनलोड करून शेतकरी लॉगिन करावे. त्यानंतर खाते क्रमांक व भूमापन (गट) क्रमांक निवडून पिकाचा प्रकार आणि क्षेत्र अचूकपणे नमूद करावे. त्यानंतर शेतातील उभ्या पिकाचा फोटो अपलोड करून माहिती सबमिट करता येणार आहे.
ई-पिक पाहणीची नोंद पीक विमा, पीक कर्ज, शासकीय योजनांचे अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीत आपल्या पिकांची अचूक नोंद करणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांना स्वतः ई-पिक पाहणीची नोंद करता येत नसेल, त्यांच्यासाठी शासनाकडून नेमण्यात आलेल्या सहाय्यकांमार्फतही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेत वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“अचूक नोंद – समृद्ध शेती – सुरक्षित भविष्य” या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची अधिक अचूक व डिजिटल नोंद उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

No comments