वाघोळा ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या चौकशीसाठी आमरण उपोषण सुरू; काशिनाथ बावस्कर यांचे पूर्णा नदीपात्रात डोंगा आंदोलन मलकापूर प्रतिनिधी : (...
वाघोळा ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या चौकशीसाठी आमरण उपोषण सुरू; काशिनाथ बावस्कर यांचे पूर्णा नदीपात्रात डोंगा आंदोलन
मलकापूर प्रतिनिधी :
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील वाघोळा ग्रामपंचायतीमध्ये सन २०१५ ते २०२५ या कालावधीत झालेल्या विविध विकासकामे, प्राप्त निधी, खर्च तसेच लेखापरीक्षण अहवालाची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थ काशीनाथ एकनाथ बावस्कर व ग्रुपच्या वतीने आज दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी आमरण उपोषण व साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.प्रशासनाकडे यापूर्वी निवेदन देऊन वाघोळा ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्याने यापूर्वीचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत अपेक्षित कार्यवाही न झाल्याने आजपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.पूर्णा नदीपात्र, जुने गाव वाघोळा येथे शिवा बावस्कर यांच्याकडून डोंगा आंदोलन सुरू करण्यात आले असून, ग्रामपंचायतीतील विकासकामे, निधीचा वापर, प्रत्यक्ष झालेली कामे व संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.या प्रकरणी स्वतंत्र चौकशी समिती नेमून सन २०१५ ते २०२५ या कालावधीतील ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला १४ वा वित्त आयोग, १५ वा वित्त आयोग, जनसुविधा, दलित वस्ती सुधार, मनरेगा तसेच इतर योजनांचा निधी आणि त्यातून झालेल्या कामांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच संबंधित कालावधीतील ग्रामपंचायतीचे उत्पन्न-खर्चाचे दप्तर, लेखापरीक्षण अहवाल आणि विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.आज आंदोलनाचा पहिला दिवस असून प्रशासनाकडून या मागण्यांवर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार काशीनाथ बावस्कर व आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


No comments