खामगावच्या जुन्या बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य! खामगाव तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) गळक्या पाईपलाईनमुळे चिखलाचा विळखा; व...
खामगावच्या जुन्या बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य!
खामगाव तालुका प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गळक्या पाईपलाईनमुळे चिखलाचा विळखा; व्यापारी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात — नगरपालिकेच्या कारभारावर संताप
खामगाव : खामगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात मागील अनेक महिन्यांपासून घाणीचे व चिखलाचे साम्राज्य पसरले असून, येथील व्यापारी व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील विविध भागांत रस्ते व नालीची कामे सुरू असताना जुन्या बसस्थानक परिसरातील या गंभीर समस्येकडे मात्र दुर्लक्ष का? असा सवाल व्यापारी वर्ग व परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जुन्या बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने दुकाने, शोरूम, वाहन दुरुस्तीची दुकाने, स्पेअर पार्ट्स व वाहनांना लागणाऱ्या विविध साहित्याची दुकाने आहेत. त्यामुळे या भागात दिवसभर दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावर साचलेले पाणी, चिखल व घाणीमुळे व्यापारी, ग्राहक आणि वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गळक्या पाईपलाईनचा प्रश्न महिन्यांपासून कायम
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विशाल हॉटेलकडून जुन्या बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर काही अंतरावर नळाच्या पाईपलाईनला अनेक महिन्यांपासून गळती आहे. या गळतीमुळे रस्त्यावर सतत पाणी साचत असून त्यातून चिखल व घाणीची समस्या निर्माण होत आहे. संबंधित विभागाकडे वारंवार तोंडी तक्रारी करूनही अद्याप या गळतीवर कायमस्वरूपी उपाय झालेला नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
कर भरतो आम्ही; सुविधा मिळणार कधी?
या परिसरातील दुकानदार व शोरूमधारक नगरपालिकेचा नियमित कर भरत असतानाही मूलभूत सुविधा व स्वच्छतेकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल व्यापारी वर्गातून केला जात आहे. रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा व स्वच्छता या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
रस्त्यावर साचणारे पाणी आणि घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात अशा ठिकाणी पाणी साचल्याने विविध आजारांचा धोका वाढू शकतो, अशी नागरिकांमध्ये चिंता आहे.
“नगरपालिका शहरातील इतर भागांत कामे करीत असेल, तर जुन्या बसस्थानक परिसरातील समस्यांकडेच दुर्लक्ष का?” असा थेट सवाल व्यापारी व नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करण्याची मागणी
जुन्या बसस्थानक परिसरातील गळतीची पाईपलाईन तातडीने दुरुस्त करावी, साचलेले पाणी व चिखल हटवावा, परिसराची स्वच्छता करावी तसेच भविष्यात अशी समस्या निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.
आता नगरपालिकेचे संबंधित अधिकारी या समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून कोणती कारवाई करतात, याकडे जुन्या बसस्थानक परिसरातील व्यापारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.



No comments