मराठी भाषा साहित्य आणि वाचन संस्कृतीचा प्रसाद व्हावा लोहारा येथे अभियान उपक्रम इदू पिंजारी फैजपूर (संपादक : हेमकांत गायकवाड) फैजपूर, मराठी...
मराठी भाषा साहित्य आणि वाचन संस्कृतीचा प्रसाद व्हावा लोहारा येथे अभियान उपक्रम
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर, मराठी भाषा, साहित्य आणि वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी आवड निर्माण होऊन त्यांच्या लेखन कौशल्याला चालना मिळावी या उद्देशाने मराठी विभाग, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांनी लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा, लोहारा येथे 'ई-साहित्य वाचन-लेखन अभियान' हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
मराठी विभाग, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी विविध शाळांमध्ये आयोजित केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, साहित्याशी त्यांचा परिचय करून देणे आणि सर्जनशील लेखनाची प्रेरणा देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे यांनी उपक्रमाची भूमिका स्पष्ट करताना आजच्या डिजिटल युगात ई-साहित्याचे वाढते महत्त्व, दर्जेदार साहित्य वाचनाची गरज आणि विद्यार्थ्यांनी नियमित वाचन व लेखनाची सवय जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनामुळे विचारक्षमता, भाषिक कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीतल पाटील या होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर करून चांगले साहित्य वाचण्याचे, लेखनाची आवड जोपासण्याचे आणि ज्ञानसमृद्ध होण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषिक अभिव्यक्ती, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास आश्रम शाळेतील सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते. तसेच धनाजी नाना महाविद्यालयाच्या मराठी विभागातील डॉ. शरद बिराडे, डॉ. दीपक सूर्यवंशी आणि प्रा. विजय तायडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत साहित्य वाचन आणि लेखनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
त्यातील प्रथम क्रमांक अरीन नुरुल्ला जमादार
द्वितीय क्रमांक नजराना शब्बीर तडवी तृतीय क्रमांक शाहीन लुकमान जमादार आणि
उत्तेजनार्थ बुशरा हमीद तडवी व साबिया जहाबीर तडवी यांना मराठी विभाग धनाजी नाना महाविद्यालयातर्फे प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले
नंतर खुल्या चर्चेच्या वेळी साहित्य वाचन, लेखन आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन सर्जनशील लेखनाला प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आश्रम शाळेतील शिक्षकवृंद तसेच मराठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन उपशिक्षिका लीना नेहते यांनी केले तर आभार डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी मानले.

No comments