पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी भरत कोळी यावल : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) “गो...
पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी
भरत कोळी यावल :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
“गोविंदा आला रे आला...” या उत्साहपूर्ण जयघोषाने पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
जन्माष्टमीच्या निमित्ताने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस अभिनयातून भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला साकारत उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची आकर्षक वेशभूषा परिधान करून उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. नटखट कान्हा आणि राधेच्या मनमोहक रूपामुळे शाळेचा परिसर जणू गोकुळनगरीतच परिवर्तित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘गोवर्धन लीला’ या विषयावरील नृत्य-नाट्य. विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय, नृत्य आणि संवादाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केल्याची पौराणिक कथा सुंदर पद्धतीने सादर केली. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यानंतर चिमुकल्या गोपाळांनी दहीहंडी फोडून जन्माष्टमीच्या उत्सवात आणखी रंगत भरली. ‘गोविंदा आला रे...’ च्या जयघोषाने संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे कार्यक्रमाला विशेष आनंदाची आणि उत्साहाची किनार लाभली.
यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. सचिन बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून प्रेम, मैत्री, धैर्य, कर्तव्यनिष्ठा, सत्य आणि सदाचार यांसारखी जीवनमूल्ये शिकण्याचे आवाहन त्यांनी केले. श्रीकृष्णाच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक मूल्ये रुजवावीत, असा संदेश त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, आकर्षक वेशभूषा, नृत्य-नाट्य सादरीकरण आणि दहीहंडीचा रोमांच यामुळे पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने अविस्मरणीय ठरला.

No comments