विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका; सर्चलाईट स्कूलमध्ये शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम मुख्याध्यापकापासून शिक्षक व शिपायापर्यंत विद्यार्थ...
विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका; सर्चलाईट स्कूलमध्ये शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम
मुख्याध्यापकापासून शिक्षक व शिपायापर्यंत विद्यार्थ्यांनी सांभाळली जबाबदारी; शिक्षकांचा सप्रेम भेट देऊन सन्मान
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वढोदे प्र. सावदा : सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल, वढोदे प्र. सावदा येथे शिक्षक दिन विविध शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेची धुरा सांभाळत अध्यापनापासून शालेय व्यवस्थापनापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवातून शिक्षण देणारा आगळावेगळा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे मॅडम होत्या. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त शाळेची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी शाळेची स्वच्छता करून परिसरात विविध सुंदर रांगोळ्या व वेल काढले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परिपाठ घेतला आणि शिक्षकांच्या भूमिकेतून अध्यापनाचे कार्य पार पाडले.
या अभिनव उपक्रमात प्रतीक लोखंडे याने विद्यार्थी मुख्याध्यापकाची, तर अनुक्षा मेढे हिने विद्यार्थी पर्यवेक्षिकेची भूमिका प्रभावीपणे पार पाडली. यासह इतर विद्यार्थ्यांनी शिक्षक, कर्मचारी व शालेय व्यवस्थापनातील विविध भूमिका उत्स्फूर्तपणे साकारल्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे व मनोगते व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय सुपडू भालेराव सर यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली भालेराव मॅडम व शिवांगी भालेराव मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनात पर्यवेक्षक पंकज भालेराव सर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
‘शिक्षक घडवतो विद्यार्थी, विद्यार्थी घडवतो उद्याचा समाज’ — अनोमदर्शी तायडे
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. “शिक्षक हा केवळ विषय शिकविणारा नसतो; तो विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देतो, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतो आणि उद्याच्या समाजाची पायाभरणी करतो,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारण्यामागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन पाहिल्याशिवाय शिक्षकाच्या जबाबदारीची खरी जाणीव होणार नाही. शिस्त, संयम, नियोजन, संवादकौशल्य आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे समानतेने पाहण्याची भूमिका या गुणांची अनुभूती विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळते. शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळविणे नसून चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक घडविणे, हीच शिक्षणाची खरी दिशा असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा सप्रेम भेटवस्तू देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता यामुळे कार्यक्रमाला भावनिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षकांच्या भूमिका पार पाडल्यामुळे त्यांना अध्यापन, शिस्त, नियोजन आणि शालेय व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्यामुळे शिक्षक दिनाचा हा उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना, आत्मविश्वासाला आणि जबाबदारीच्या जाणिवेला बळ देणारा अभिनव शैक्षणिक प्रयोग ठरला.
शिक्षकांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालक व उपस्थितांनी कौतुक केले.

No comments