adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कायद्याचे उल्लंघन करून कर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या चालकावर चोपडा पोलिसांची कारवाई ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडल्याचे मोजमापात स्पष्ट; भारतीय न्याय संहिता व ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल

कायद्याचे उल्लंघन करून कर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या चालकावर चोपडा पोलिसांची कारवाई ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडल्याचे मोजमापात स्पष्ट; भा...

कायद्याचे उल्लंघन करून कर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या चालकावर चोपडा पोलिसांची कारवाई

ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडल्याचे मोजमापात स्पष्ट; भारतीय न्याय संहिता व ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल



चोपडा प्रतिनिधी : अशोक कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

सण,उत्सव व मिरवणुकांच्या काळात ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून मोठ्या व कर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या चालकाविरुद्ध चोपडा शहर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.६ सप्टेंबर २०२६ रोजी जहागीरदार गोगाजी महाराज जन्मोत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. मिरवणुकीपूर्वी संबंधित मंडळे व आयोजकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या तसेच मोठ्या क्षमतेच्या डीजे/साउंड सिस्टीमचा वापर न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र,मिरवणुकीदरम्यान रूपम ज्वेलर्स,चोपडा परिसरात मोहिनी डीजे बँडचे मालक सचिन उर्फ पिंटू पंडित शिरसाठ(वय ३७,रा.पंचशील नगर,चोपडा) हे मोठ्या व कर्कश आवाजात डीजे साउंड सिस्टीम वाजवीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी संबंधित डीजे चालकास ध्वनी प्रदूषण थांबविण्याबाबत समज दिल्यानंतरही डीजे वाजविणे सुरूच ठेवण्यात आल्याने पंचांसमक्ष Testo कंपनीच्या Noise Level Measuring Instrument द्वारे डीजेच्या आवाजाची तीव्रता मोजण्यात आली. या तपासणीत LEQ ११५.६ डेसिबल, LAF Max १२०.९ डेसिबल आणि LAF Min ११३.० डेसिबल इतकी ध्वनी तीव्रता नोंदविण्यात आली. निर्धारित मर्यादेपेक्षा ही ध्वनी तीव्रता अधिक असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, मिरवणूक शांततेत समाप्त झाल्यानंतरही संबंधित डीजे चालकाने डीजे वाजविणे सुरूच ठेवले, अशी नोंद पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत सचिन उर्फ पिंटू पंडित शिरसाठ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३, २९२, ३(५), ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम, २००० मधील कलम ३ व ४ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिक, मंडळे, मिरवणूक आयोजक व डीजे चालकांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भातील शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, धार्मिक, सामाजिक अथवा इतर कार्यक्रमांसाठी परवानगी घेताना पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटी व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मोठ्या आवाजात, कर्कश पद्धतीने किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक तीव्रतेने डीजे अथवा साउंड सिस्टीम वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा पोलिसांनी दिला आहे. सण-उत्सव शांततेत, शिस्तीत आणि आनंदाने साजरे करण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कारवाईस पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते चाळीसगाव,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावली.

No comments