adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

“साहेब, आमच्या शाळेत असलेले तरी शिक्षक राहू द्या!” शिक्षकांची कमतरता असताना गणित-विज्ञान शिक्षकाचे तीन दिवस दुसऱ्या शाळेत अध्यापन; कासार बालकुंद्यात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांची आर्त हाक “पूर्णवेळ शिक्षक द्या, गरीबाच्या लेकराला शिकू द्या”; शिक्षण विभागाच्या निर्णयाने शाळेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

 “साहेब, आमच्या शाळेत असलेले तरी शिक्षक राहू द्या!” शिक्षकांची कमतरता असताना गणित-विज्ञान शिक्षकाचे तीन दिवस दुसऱ्या शाळेत अध्यापन; कासार बा...

 “साहेब, आमच्या शाळेत असलेले तरी शिक्षक राहू द्या!”

शिक्षकांची कमतरता असताना गणित-विज्ञान शिक्षकाचे तीन दिवस दुसऱ्या शाळेत अध्यापन; कासार बालकुंद्यात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांची आर्त हाक

“पूर्णवेळ शिक्षक द्या, गरीबाच्या लेकराला शिकू द्या”; शिक्षण विभागाच्या निर्णयाने शाळेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह



लातूर, जि.प्र.(उत्तम माने )

(संपादक : हेमकांत गायकवाड)

निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती कासार बालकुंदा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आधीच शिक्षकांची कमतरता असताना, शाळेतील गणित व विज्ञान विषयाचे माध्यमिक शिक्षक श्री. भिसे सीताराम पंडीत यांना आठवड्यातील तीन दिवस माळेगाव (क.) येथील शाळेत अध्यापनासाठी पाठविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “आमच्या शाळेत असलेले तरी शिक्षक पूर्णवेळ राहू द्या, गरीबाच्या लेकराला शिकू द्या,” अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जिल्हा परिषद लातूरच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार भिसे सीताराम पंडीत हे सोमवार, मंगळवार व बुधवार कासार बालकुंदा येथे, तर गुरुवार, शुक्रवार व शनिवार माळेगाव येथे अध्यापन करणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि उपलब्ध शिक्षक मनुष्यबळाचा योग्य वापर करण्यासाठी ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, कासार बालकुंदा शाळेतच शिक्षकांची कमतरता असताना उपलब्ध शिक्षकाचे तीन दिवस दुसऱ्या शाळेत समायोजन केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. गणित व विज्ञान विषयासाठी भिसे हे महत्त्वाचे शिक्षक असल्याने, “तीन दिवसांत विद्यार्थ्यांना गणित विषय कसा समजणार?” असा सवाल ग्रामस्थ रंजीत कोकणे यांनी उपस्थित केला.

कासार बालकुंदा जिल्हा परिषद प्रशाला ही परिसरातील जुनी शाळा असून, एकेकाळी येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, शिक्षकांची कमतरता आणि वेळेवर शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत शाळेची पटसंख्या घटल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सीमावर्ती भागातील इतर काही शाळांमध्येही शिक्षकांची कमतरता असल्याचा दावा करण्यात येत आहे.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे यांनी भिसे शिक्षकांची तीन दिवसांची व्यवस्था तात्काळ रद्द करून कासार बालकुंदा शाळेला गणित विषयाचा पूर्णवेळ शिक्षक द्यावा, अशी मागणी केली. माजी उपसरपंच संतोष नायब यांनीही शाळेतील शिक्षकांची कमतरता तातडीने दूर करण्याची मागणी केली.

दरम्यान, शिक्षणाधिकारी विकास कुकडे यांनी काही दिवस सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, अतिरिक्त शिक्षकांचे विषयानुसार समायोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कासार बालकुंदा शाळेलाही प्रत्येक विषयासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नावर ग्रामसभेत ठराव घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिक्षण विभागाने आदेशाचा पुनर्विचार करून कासार बालकुंदा शाळेतील शिक्षकांची कमतरता तातडीने दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

No comments