पावसाने दांडी, विजेचा लपंडाव; हवालदिल शेतकऱ्यांसाठी शिवसेना मैदानात खामगाव तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) शेतकऱ्यांच्या विविध ...
पावसाने दांडी, विजेचा लपंडाव; हवालदिल शेतकऱ्यांसाठी शिवसेना मैदानात
खामगाव तालुका प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून, खामगाव तालुका तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी शेतकऱ्यांना स्वतः पीक पाहणी करण्याची मुभा होती.परंतु सध्या ही पद्धत बंद करून ग्राम महसूल अधिकाऱ्यांना गावातील सहायक नेमून देण्यात आला आहे आणि त्यांच्याशिवाय ई-पीक पाहणी करता येत नाही. दि. 31/08/2026 पासून ई-पीक पाहणीचे सहायक बेमुदत संपावर गेल्याची माहिती ग्रुपवर व्हायरल झाली आहे.
जर खरीप हंगामातील ई-पीक पाहणी वेळेत झाली नाही आणि मुदत संपून गेली तर शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर ई-पीक पेरा नोंदवला जाणार नाही. त्यामुळे बँक कर्ज, पीक विमा, फळपीक अनुदान यासारख्या शासकीय कामांसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
तसेच, मागील महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्यामुळे कोरडवाहू पिके पूर्णपणे जळून गेली आहेत. काही शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची साधने असली तरी भारनियमन आणि विजेच्या लपंडावामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. या सर्व कारणांमुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झाला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आमच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत द्यावी.
खामगाव तालुका तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा.
ई-पीक पाहणीचे काम पर्यायी व्यवस्थेने तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
या मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय आवताडे तालुकाप्रमुख राजेंद्र बघे,शिवसेना नेते लोखंडकर,शहर प्रमुख चेतन ठोंबरे महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री देशमुख,ज्योती बुजाडे,कल्पना गायगोळे,निर्मलाबाई हेलोडे किसान सेना तालुकाप्रमुख सोपान वाडेकर,उपतालुकाप्रमुख प्रवीण धामोडे सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख बहादूर वाघे,युवा सेना तालुकाप्रमुख विकास जवंजाळ शहर समन्वयक भाऊ बिडकर यांच्यासह गोपाल भिल,गजानन मोरखडे,सुभाष वाकुडकर,अमोल फिरंगे,करण छापरवाल,शुभम मोरे,प्रकाश हिवराळे,मंगेश काळे व असंख्य शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments