मायबाप सरकार दुष्काळाकडे लक्ष द्या! ही वेळ केवळ पाहणी करण्याची नाही तर प्रत्यक्ष मदत करण्याची आहे. लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक...
मायबाप सरकार दुष्काळाकडे लक्ष द्या!
ही वेळ केवळ पाहणी करण्याची नाही तर प्रत्यक्ष मदत करण्याची आहे.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सोयाबीनच्या शेंगा करपल्या..
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर.
लातूर :-सालाबादप्रमाणे याही वर्षी पुन्हा एकदा निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. जिल्ह्यात सोयाबीन, ऐन बहरात असतांनाच वरुणराजाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोयाबीन उत्पादक हवालदिल
जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाअभावी त्या करपून गेल्या आहेत. शेतात उभे पीक जळून चालल्याचे चित्र आहे. एकरी ८ ते १० क्विंटलची अपेक्षा असताना आता २ ते ३ क्विंटलही पदरात पडेल की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. लाखो रुपयांचा खर्च करूनही हाती काहीच न लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोयाबीन पाण्याअभावी कोमात गेली आहेत. तुरीची फुलगळ होत आहे.लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे सोयाबीन पीक सुद्धा करपायला लागले असून, याचा थेट फटका शेतकऱ्याच्या अर्थकारणाला बसला आहे.
चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न
पावसाअभावी ज्वारी, बाजरी यासारख्या चारा पिकांनीही माना टाकल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अनेक गावांमध्ये पाणी पातळी खालावली आहे.
शासनाने तातडीने दखल घ्यावी
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मायबाप सरकारने तात्काळ वाशिम जिल्ह्याकडे लक्ष द्यावे. सरसकट पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा आणि आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला हेक्टरी एक लाख रुपयांची मदत, पीक विमा आणि कर्जमाफी देऊन आधाराचा हात द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

No comments