यावल येथे श्री गणरायाचे उत्साहात आगमन घरोघरी स्थापना; सार्वजनिक गणेश मंडळांची जय्यत तयारी यावल तालुका प्रतिनिधी भरत कोळी (संपादक : हेमकांत ...
यावल येथे श्री गणरायाचे उत्साहात आगमन
घरोघरी स्थापना; सार्वजनिक गणेश मंडळांची जय्यत तयारी
यावल तालुका प्रतिनिधी भरत कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल शहरात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाले. शहरातील विविध भागांत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई आणि भक्तिमय वातावरणामुळे यावल शहरासह ग्रामीण भागातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.
सकाळपासूनच गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. सजवलेल्या वाहनांमधून गणरायाची मूर्ती आणण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणुका काढण्यात आल्या. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने बाप्पांचे स्वागत केले.
सार्वजनिक गणेश मंडळांनीही उत्सवाची जय्यत तयारी केली असून, विविध आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई आणि सुंदर सजावट करण्यात आली आहे. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेपूर्वी घरांची स्वच्छता, पूजा साहित्याची तयारी तसेच सजावटीची कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर विविध भागांत विधिवत पूजा-अर्चा करून श्री गणरायाची स्थापना करण्यात आली.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मिरवणुका, वाहतूक व्यवस्था, गर्दीची ठिकाणे तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरातील विविध चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


No comments