दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरे; “घाबरू नका, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तुमच्या पाठीशी” उत्तम माने लातुर जि.प्र. (...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरे; “घाबरू नका, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तुमच्या पाठीशी”
लातूर : औसा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी तावशी ताड परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने या भागातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी रब्बी हंगामातील पेरणीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सततच्या नैसर्गिक संकटांमुळे औसा तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी “घाबरून जाऊ नका, आपल्या जिवाचे काहीही बरे-वाईट करून घेऊ नका. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा धीर दिला.
जीआरमध्ये मदतीचे स्वरूप स्पष्ट करावे : आदित्य ठाकरे
शासनाने दुष्काळाच्या अनुषंगाने जीआर काढला असला, तरी कोणत्या तालुक्याला किती मदत मिळणार आणि कोणत्या स्वरूपाची मदत दिली जाणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
केवळ शासन निर्णय जाहीर करून उपयोग नाही, तर त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारी मदत, तिचे स्वरूप आणि अंमलबजावणी याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित जीआरला अपेक्षित महत्त्व राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
“शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि आवश्यक उपाययोजना मिळणे गरजेचे असताना सरकारकडून केवळ घोषणा केल्या जात आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही, याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला शेतकऱ्यांशीही साधला संवाद
तावशी ताड परिसरात मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या. आदित्य ठाकरे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी धीर न सोडता परिस्थितीला सामोरे जावे, तसेच शिवसेना व युवा सेना त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी परिसरात सुरू असलेल्या उपोषणस्थळालाही त्यांनी भेट दिली. उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरही केली टीका
याच भागात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उपस्थित होते, मात्र मुख्यमंत्री त्या ठिकाणी थांबले नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्याला माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन
आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरकारच्या धोरणांबाबत सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती अंबादास दानवे, उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख परमेश्वर सातपुते, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, बजरंग जाधव, शिवराज मुळगावकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका जयश्री उटगे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, आकाश माने, सोशल मीडिया प्रमुख विशाल पवार, शहरप्रमुख सुरेश भूरे यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments