श्रीकृष्ण मंदिरात भागवत सप्ताहानिमित्त सुरांची मैफिल डॉ. गिरीष टिल्लू परिवाराची पाच वर्षांपासून अखंड संगीतसेवेची परंपरा चोपडा तालुका प्रति...
श्रीकृष्ण मंदिरात भागवत सप्ताहानिमित्त सुरांची मैफिल डॉ. गिरीष टिल्लू परिवाराची पाच वर्षांपासून अखंड संगीतसेवेची परंपरा
चोपडा तालुका प्रतिनिधी : -
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
येथील श्रीकृष्ण मंदिरात सुरू असलेल्या भागवत सप्ताह निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात सुरांची सुंदर मैफिल रंगली. गेल्या पाच वर्षांपासून डॉ. गिरीष टिल्लू व परिवाराच्या वतीने या संगीत कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून, यंदाही विविध गीतांच्या सादरीकरणाने उपस्थित भाविक व संगीतप्रेमी मंत्रमुग्ध झाले.
आदरणीय मयूर गुजराथी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात तबला वादन, हार्मोनियम व विविध गीतांचे सादरीकरण केले. सुरेल गायन आणि वाद्यसंगतीमुळे श्रीकृष्ण मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
‘वंदे मातरम्’ने झाली सुरेल सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात कु. आरोही अमित बाविस्कर हिने सुमधुर आवाजात सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थी तसेच ज्येष्ठ भगिनींनी देशभक्तीपर गीते, जुन्या हिंदी चित्रपटांतील अजरामर गाणी आणि विविध भक्तिगीते सादर केली. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या मैफिलीचे विशेष आकर्षण ठरले ते डॉ. लोकेंद्र महाजन यांनी सादर केलेले ‘तुझे रूप चित्ती राहो’ हे गीत. भावपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमात चिमुकल्या बालकलाकारांनीही उत्साहाने सहभाग घेतला. लहान बालकलाकारांनी तबला व हार्मोनियमवर अप्रतिम साथसंगत केली. लाल फ्रॉकमधील चिमुकलीसह बाल गोपाळांनी एकापाठोपाठ एक भजने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर गुजराथी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गिरीष टिल्लू यांनी केले.
अतिशय सुंदर, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सुरेल संध्याकाळी असंख्य भाविक, श्रोते, संगीतप्रेमी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व बालकलाकारांचा नारळ देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून संगीताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळत असून, भागवत सप्ताहातील भक्तिमय वातावरणाला या सुरेल मैफिलीने विशेष रंगत आणली.



No comments