वर्गखोलीत पावसाचे पाणी; हासोरी खुर्द जि.प. शाळेतील २३ विद्यार्थ्यांची गैरसोय. शिक्षिका दीर्घ रजेवर; तात्पुरता शिक्षक नसल्याने इयत्तांचे एकत्...
वर्गखोलीत पावसाचे पाणी; हासोरी खुर्द जि.प. शाळेतील २३ विद्यार्थ्यांची गैरसोय.
शिक्षिका दीर्घ रजेवर; तात्पुरता शिक्षक नसल्याने इयत्तांचे एकत्रित अध्यापन.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक : हेमकांत गायकवाड)
निलंगा:-मौजे हासोरी (खुर्द) तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील जिल्हा परिषद शाळेतील एका वर्गखोलीत पावसाचे पाणी शिरत असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या वेळी वर्गखोलीत पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन आणि वर्गातील दैनंदिन कामकाज प्रभावित होत असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली.
हासोरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये १२ मुले व ११ मुलींचा समावेश आहे. इयत्ता पहिलीमध्ये ५, दुसरीमध्ये ३, तिसरीमध्ये ५ आणि चौथीमध्ये १० विद्यार्थी आहेत.
शाळेतील शिक्षिका सुप्रिया कांबळे या २ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत तात्पुरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याने उपलब्ध शिक्षकांमार्फत विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांचे एकत्रित अध्यापन केले जात असल्याचे सांगण्यात आले.
गळणाऱ्या वर्गखोलीचा प्रश्न
शाळेतील एका वर्गखोलीचे छत पावसाळ्यात गळत असल्याने पावसाचे पाणी थेट वर्गखोलीत शिरते. त्यामुळे पाऊस सुरू असताना वर्गखोलीत पाणी साचून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तसेच अध्यापनासाठी अडचणी निर्माण होतात. शैक्षणिक साहित्याच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भौतिक सुविधांची यू-डायसमध्ये नोंद
शाळेतील भौतिक सुविधांबाबतची माहिती यू-डायस प्रणालीमध्ये ऑनलाइन भरलेली असल्याचे मुख्याध्यापिका सौ. हरिदास शारदा व्यंकटराव यांनी सांगितले. तसेच, सुमारे १५ दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या वतीने पाहणी पथक शाळेत आले होते. पथकाने शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली असून, केंद्रप्रमुख माचेवाड यांनीही भौतिक सुविधांबाबतची माहिती ऑनलाइन संकलित केल्याचे मुख्याध्यापिकांनी सांगितले.
नवीन शौचालयाचे काम अपूर्ण
शाळेत सध्या जुने शौचालय वापरात आहे. मुलींसाठी नवीन शौचालयाचे काम सुरू करण्यात आले असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जुने शौचालय वापरावे लागत असल्याची माहिती मुख्याध्यापिकांनी दिली. मुलांसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना शौचालयासाठी शाळेबाहेर जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शाळेच्या परिसरातील काही भागात गवत वाढलेले असून, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खेळाचे मैदान किंवा पुरेसे प्रांगण उपलब्ध नसल्याचेही शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तात्पुरता शिक्षक व दुरुस्तीची मागणी
एका शिक्षिकेच्या दीर्घ रजेमुळे विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय अध्यापन सुरळीत राहण्यासाठी तात्पुरत्या शिक्षकाची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्याचबरोबर पावसात गळणाऱ्या वर्गखोलीची दुरुस्ती, अपूर्ण शौचालयाचे काम पूर्ण करणे, परिसरातील गवत व स्वच्छतेचा प्रश्न सोडविणे तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित शिक्षण विभाग व पंचायत समिती प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



No comments