adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षक दिन विशेष: बदलती शैक्षणिक क्षितिजे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या महापुरात 'गुरू'चे अढळ स्थान

  शिक्षक दिन विशेष: बदलती शैक्षणिक क्षितिजे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या महापुरात 'गुरू'चे अढळ स्थान      गुरु गोविंद दोऊ खड़े,      क...

 शिक्षक दिन विशेष: बदलती शैक्षणिक क्षितिजे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या महापुरात 'गुरू'चे अढळ स्थान 


    गुरु गोविंद दोऊ खड़े, 

    काके लागूं पाय।

    बलिहारी गुरु आपने, 

    गोविंद दियो बताय॥

अर्थात, देव आणि गुरू दोघेही समोर उभे असतील, तर आधी गुरूचे पाय धरावेत. कारण गुरूंनीच देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला आहे.

संत कबीरांचा हा दोहा आजही आपल्याला त्या सर्वोच्च कृतज्ञतेची आठवण करून देतो, जी आपण दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' म्हणून साजरी करतो.भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्त्ववेत्ते आणि आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्याची आपली ही समृद्ध परंपरा आहे.परंतु, आज आपण ज्या २१ व्या शतकात जगत आहोत, त्याला 'माहिती तंत्रज्ञानाचे युग' किंवा 'एआय (Artificial Intelligence) चे युग' म्हटले जाते. आज चॅटजीपीटी, गुगल आणि युट्युबच्या एका क्लिकवर जगातील सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या हातातील स्क्रीनवर उपलब्ध आहे. अशा काळात "जर सर्व काही इंटरनेटवर उपलब्ध आहे, तर मग शिक्षकाची गरज काय?"असा एक वरवरचा पण अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला जातो.या डिजिटल क्रांतीच्या काळात शिक्षण व्यवस्थेत नेमका काय बदल झाला आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला पारंपरिक शिक्षण आणि आजची आधुनिक डिजिटल परिस्थिती या दोन्हीचा वेध घेणे गरजेचे ठरते.

 आधीची परिस्थिती:-

संस्कार,आदर आणि मर्यादित साधने अशी काही दशकांपूर्वीची शिक्षण पद्धती आठवली, तर समोर येते ती 'गुरू-शिष्य' परंपरेची एक सुस्पष्ट प्रतिमा. त्यावेळी शिक्षण 'शिक्षक-केंद्रित' होते आणि शिक्षक हेच ज्ञानाचे एकमेव आणि अंतिम स्त्रोत असायचे. पाटी-पेन्सिल, मोजकीच पुस्तके आणि फळा-खडू हेच शिक्षणाचे जग होते. शिक्षकांचा शब्द अंतिम असायचा आणि समाजात त्यांना कमालीचा आदर होता. अभ्यासासोबतच नैतिक मूल्ये, संस्कार आणि कडक शिस्त यावर सर्वाधिक भर दिला जात असे. 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' यावर पालकांचाही पूर्ण विश्वास होता आणि शिक्षकांच्या शिस्तीला पालकांचा नेहमीच पाठिंबा असायचा.

 बदलती शिक्षण पद्धती:- खडू-फळ्याकडून डिजिटल स्क्रीनकडेआज काळ बदलला आहे आणि शिक्षण आता 'विद्यार्थी-केंद्रित' झाले आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने वर्गाचे रूप पालटून टाकले आहे. आजचा फळा डिजिटल झाला असून ई-बुक्स, टॅब्लेट्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून क्लिष्ट विषयही विद्यार्थ्यांना सहज समजू लागले आहेत. पूर्वी ज्ञानाचे एकमेव साधन शिक्षक आणि ग्रंथालय होते, तर आज इंटरनेटमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे. केवळ पाठांतरापेक्षा आता प्रोजेक्ट्स, प्रात्यक्षिके आणि सर्वांगीण मूल्यमापन यावर भर दिला जात आहे.

 माहिती विरुद्ध ज्ञान:-

"ज्ञान ही सर्वात मोठी शक्ती आहे, आणि ते देणारा शिक्षक हा या विश्वातील सर्वात मोठा शिल्पकार आहे."

माहिती तंत्रज्ञानाने शिक्षणाचे लोकशाहीकरण केले आहे यात शंका नाही.दुर्गम भागातील विद्यार्थ्यालाही आज जागतिक दर्जाचे शिक्षण ऑनलाईन मिळू शकते. परंतु, येथेच एक मोठी गफलत होते— 'माहिती' (Information) म्हणजे 'ज्ञान' (Knowledge) नव्हे आणि 'ज्ञान' म्हणजे 'शहाणपण' नव्हे.

गुगल माहिती देईल, विवेक नाही:-

इंटरनेट विद्यार्थ्याला सिद्धांतांची माहिती देऊ शकते, पण त्या माहितीचा वापर समाजाच्या कल्याणासाठी कसा करायचा, हा विवेक केवळ एक शिक्षकच शिकवू शकतो.

 सत्य आणि असत्याची पारख:-

आज इंटरनेटवर माहितीचा महापूर आहे, ज्याला 'इन्फॉर्मेशन ओव्हरलोड' म्हणतात. यात कोणती माहिती खरी, कोणती खोटी आणि आपल्यासाठी कोणती योग्य, हे निवडण्याचे कौशल्य शिक्षकच विद्यार्थ्याला देतात.एआय (AI) कडे अल्गोरिदम आहे, 'हार्ट' नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) रोबोटिक पद्धतीने शिकवू शकते, पण विद्यार्थ्याच्या डोळ्यांतील गोंधळ ओळखून, त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवून, "घाबरू नकोस, मी आहे ना!" हा धीर देण्याचे काम कोणतेही तंत्रज्ञान करू शकत नाही. शिक्षणाचे मानवीकरण केवळ शिक्षकांमुळेच शक्य आहे.

"पाटीवरल्या अक्षरांना 

जिवंत रूप ज्यांनी दिले,

माहितीच्या या महापुरात ज्यांनी ज्ञानाचे दीप लावले."

गुगलवर मिळेल माहिती जगाची जरी सगळी,पण जगणे कसे हे तर फक्त शिक्षकांनीच शिकवले.

नव्या ध्येय-धोरणांची आव्हाने: 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)आजची शिक्षण पद्धती ही केवळ पदवी देणारी न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी असावी, या ध्येयाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (NEP) देशात लागू होत आहे. या नव्या धोरणात कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमधील भिंती आता कमकुवत झाल्या आहेत. केवळ पुस्तकी किडा बनवण्याऐवजी विद्यार्थ्यांना कोडिंग, व्यावसायिक कौशल्ये, तंत्रज्ञान आणि मातृभाषेतून पायाभूत शिक्षण यावर भर दिला जात आहे. पाठांतर पद्धती बंद करून विद्यार्थ्यांना 'शोधक' बनवणे, त्यांच्यात नवनिर्मितीची (Creativity) क्षमता जागवणे, हे नव्या धोरणाचे ध्येय असून त्याचे सारथ्य देशातील शिक्षकच करत आहेत.

विद्यार्थी आणि पालकांची बदलती मानसिकता:-

कबीर कूंआ एक है, 

पानी भरे अनेक।

भांडे ही में भेद है,

 पानी सब में एक॥

अर्थात, विहीर एकच असते, पण पाणी भरणारे आणि भांडी वेगवेगळी असतात.पाणी मात्र एकच असते. तसेच आजचा प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, त्याची ग्रहणक्षमता आणि कल वेगळे आहेत, हे शिक्षकांना ओळखावे लागते.आजचा विद्यार्थी कमालीचा 'स्मार्ट' आणि तंत्रस्नेही (Tech-savvy) आहे. त्याला जगाची माहिती आहे. परंतु, सोशल मीडियाचे आभासी जग, गुणांची जीवघेणी स्पर्धा आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांमुळे आजची पिढी मानसिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि एकाकी बनत चालली आहे.

दुसरीकडे, आजचे पालक सुशिक्षित, 'अति-जागरूक' आणि काहीसे 'अति-संरक्षक' झाले आहेत. मुलांच्या भौतिक गरजा पूर्ण करताना, त्यांच्यावर क्लासेसचे ओझे लादले जाते, पण शिक्षकांनी मुलाला शिस्त लावण्यासाठी थोडे रागावल्यास, पालक लगेच शाळेत जाब विचारायला येतात. अशा वातावरणात शिक्षकांना केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर अनेकदा पालकांचेही समुपदेशन (Counselling) करावे लागते.

तंत्रज्ञान हे साधन, शिक्षक हेच साध्य!

"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,

 आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माहिती तंत्रज्ञानाच्या या अथांग जगात शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही, उलट ते शतपटीने वाढले आहे. तंत्रज्ञान हे केवळ एक 'साधन' (Tool) आहे, ते शिक्षकाला पर्याय कधीही ठरू शकत नाही. उत्तम ड्रायव्हरशिवाय जशी महागडी गाडी धावू शकत नाही, तसेच उत्तम शिक्षकाशिवाय कितीही प्रगत तंत्रज्ञान असले तरी सुजाण राष्ट्र घडवता येत नाही.चैतन्याचे दीप लावून अंधार दूर सारतात,शब्दांच्या या अथांग जगात जे जगणे शिकवतात.अशा माझ्या गुरुरायाला,शिक्षक दिनी मनोभावे सादर नमन करतात!

शिक्षक हा केवळ अक्षरे गिरवून घेणारा माणूस नसून, तो विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडणारा शिल्पकार आहे. आजच्या डिजिटल अंधारात मूल्यांचा आणि नैतिकतेचा प्रकाश देणारा तो एकमेव दीपस्तंभ आहे. म्हणूनच, या शिक्षक दिनी तंत्रज्ञानाचा आदर करतानाच, मानवी मूल्यांची पेरणी करणाऱ्या आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि 'शिक्षक, पालक व विद्यार्थी' या त्रिसूत्रीमध्ये सुसंवाद राखण्याचा संकल्प करूया. हीच डॉ. राधाकृष्णन यांना खरी श्रद्धांजली ठरेल!

शब्दांकन:-

श्री संजय ठाकुर उपशिक्षक, जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर

No comments