जळगावच्या तरुणाचा प्रेरणादायी यशप्रवास; वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईच्या पाठबळावर गाठले सैन्यदलातील अधिकारी पद जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- ...
जळगावच्या तरुणाचा प्रेरणादायी यशप्रवास; वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईच्या पाठबळावर गाठले सैन्यदलातील अधिकारी पद
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. शिक्षण असो, नोकरी असो किंवा करिअरचे कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी स्पर्धेला सामोरे जावे लागते. या स्पर्धेत यश-अपयश हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यश आनंद देत असले, तरी अपयशामुळे अनेक जण खचून जातात. मात्र, प्रयत्नांमध्ये सातत्य, मेहनत करण्याची जिद्द आणि ध्येय गाठण्याची चिकाटी असेल तर अपयशावरही मात करता येते, याचे उत्तम उदाहरण जळगावचे तरुण ऋषिकेश अनिल मिश्रा (मिसर) यांनी घालून दिले आहे.
तब्बल ११ वेळा अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्नांची कास धरत अखेर १२व्या प्रयत्नात भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर निवड झाल्याने ऋषिकेश यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अनेक तरुणांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारा आहे.
ऋषिकेश मिश्रा यांचा आज लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास पाहता तो सहज आणि सोपा वाटू शकतो; मात्र त्यामागे संघर्ष, मेहनत आणि अनेक अडचणी आहेत. ऋषिकेश अवघे १६ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले.
पोस्ट खात्यात कार्यरत असलेले त्यांचे वडील अनिल मधुकर मिश्रा यांचे २०१६ मध्ये निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आई पूजा मिश्रा यांनी एकुलत्या एक ऋषिकेश यांच्यासह कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. प्रतिकूल परिस्थितीतही ऋषिकेश यांनी शिक्षण सुरू ठेवत अभियांत्रिकीची बी.टेक. पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर खासगी नोकरीही सुरू केली.
मात्र, आयुष्यात काहीतरी वेगळे आणि साहसी करण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होती. देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
खासगी नोकरी आणि सैन्य भरतीची तयारी एकाचवेळी करणे हे मोठे आव्हान होते. दिवसभर नोकरी करून उरलेल्या वेळेत अभ्यास आणि सैन्य निवड प्रक्रियेची तयारी करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला.
या काळात अनेक अडचणी आल्या. अपेक्षित यश मिळाले नाही. तब्बल ११ वेळा परीक्षेत अपयश आले. मात्र, प्रत्येक अपयशातून धडा घेत ऋषिकेश यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अपयशामुळे न खचता त्यांनी अभ्यास, तयारी आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला.
या संपूर्ण प्रवासात आई पूजा यांचे प्रोत्साहन आणि पाठबळ ऋषिकेश यांच्यासाठी मोठी ताकद ठरली.
अनेक अपयशानंतरही प्रयत्नांची सातत्यपूर्ण वाटचाल सुरू ठेवणाऱ्या ऋषिकेश यांच्या मेहनतीला अखेर यश मिळाले. १२व्या प्रयत्नात त्यांनी भारतीय सैन्यदलातील अधिकारी पदाची परीक्षा व निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार केली.
भारतीय सैन्याच्या सेवा निवड मंडळाची म्हणजेच एसएसबीची निवड प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. ही प्रक्रिया साधारण पाच दिवस चालते. यामध्ये मानसशास्त्रीय चाचण्या, वैयक्तिक मुलाखत तसेच विविध गटचाचण्यांच्या माध्यमातून उमेदवाराची नेतृत्वक्षमता, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, मानसिक तयारी आणि व्यक्तिमत्त्वाची परीक्षा घेतली जाते.
ऋषिकेश यांनी या सर्व टप्प्यांमध्ये आपली क्षमता सिद्ध करत अखेर लेफ्टनंट पदावर निवड मिळवली. आता ते देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत.
आपल्या यशामध्ये अपयशाचाही मोठा वाटा असल्याचे ऋषिकेश सांगतात. तरुणांनी अपयशाने खचून न जाता त्यातून शिकले पाहिजे. अपयश हे आपल्या क्षमतेचे मोजमाप नसून स्वतःला अधिक सक्षम बनवणारा अनुभव आहे, असे त्यांचे मत आहे.
अपयशाकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता त्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर काम केले पाहिजे. पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नांमध्ये सातत्य आणि मेहनत कायम ठेवली, तर एक दिवस यश निश्चित मिळते, असा विश्वास ऋषिकेश यांनी व्यक्त केला.
ऋषिकेश मिश्रा यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास हा आजच्या स्पर्धेच्या युगातील तरुणांसाठी निश्चितच “अपयशातून यशाकडे जाण्याचा प्रेरणादायी धडा” ठरला आहे.

No comments