तळेगाव काचुरली धरणात बुडालेल्या इसमाचा तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला जयवंत हागोटे त्रंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) त्र्यंबकेश्...
तळेगाव काचुरली धरणात बुडालेल्या इसमाचा तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला
जयवंत हागोटे त्रंबकेश्वर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव काचुरली धरणात पोहण्यासाठी गेलेल्या राजू काळू निरगुडे यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू काळू निरगुडे हे दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या दरम्यान तळेगाव काचुरली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पोहत असताना ते पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती शासकीय यंत्रणा तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याला देण्यात आली.
घटनेनंतर बुडालेल्या इसमाचा शोध घेण्यासाठी दोन दिवस शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर तिसऱ्या दिवशी गावातील पोहण्यात तरबेज असलेल्या नागरिकांनी टायरच्या ट्यूबच्या साहाय्याने धरणात शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर राजू काळू निरगुडे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले.
मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय, नाशिक येथे पाठविण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


No comments