जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलची धनश्री वाघमारे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ मध्ये जिल्हास्तरावर द्वितीय तर विभाग स्तरासाठी ...
जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलची धनश्री वाघमारे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ मध्ये जिल्हास्तरावर द्वितीय तर विभाग स्तरासाठी पात्र
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. धनश्री वाघमारे हिने महाराष्ट्र शासन राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा नॅशनल सायन्स सेमिनार 2026) च्या जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात आणखी एकदा मानाचा तुरा खोवला आहे.
गुरुकुलम ग्लोबल स्कूल जळगाव येथील पार पडलेल्या यंदाच्या विज्ञान मेळाव्याचा विषय "भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ भवितव्य (संधी) आणि आव्हाने" असा होता. या विषयावर धनश्री वाघमारे हिने प्रभावी, आत्मविश्वास पूर्ण मांडणी, तर्कशुद्ध विचार आणि उत्कृष्ट सादरीकरणाद्वारे परीक्षकांची मने जिंकत सुरुवातीला तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवून आता जिल्हास्तरावर १५ तालुक्यांमधील शाळांतील किमान २८ विद्यार्थ्यांमधून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याचबरोबर आगामी विज्ञान परिषद विभागीय स्पर्धेकरिता नाशिक विभागासाठी ते पात्र ठरली आहे. तिच्या यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक मोझेस जाधव यांचा पाठिंबा असून विज्ञान शिक्षिका सौ. मनीषा ढाके व शिक्षक अनिकेत पाटील यांचे परिश्रमपूर्वक मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रमशील विचार आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे यशस्वी फलित मानले जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव विजय झोपे,मानद सह सचिव शशिकांत चौधरी आणि संचालक मंडळ व शाळेचे मुख्याध्यापक मोझेस जाधव, पर्यवेक्षिका सौ. पूनम नेहेते, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी धनश्री वाघमारे चे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
धनश्री वाघमारे च्या या दैदिप्यमान यशामुळे जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची, वैज्ञानिक संस्कारांची आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक परंपरेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरले आहे. तिच्या आगामी विभागीय विज्ञान मेळाव्या करिता संपूर्ण जे टी महाजन परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात येत आहे.

No comments