बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : धीरज फाटे पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपली; उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवर व...
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : धीरज फाटे
पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपली; उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ ?
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था गंभीर झाली असून अनेक भागांतील पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी धीरज फाटे यांनी केली आहे.
पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस वेळेवर न झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी, बियाणे, खते, औषधे तसेच मशागतीवर मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके अक्षरशः करपून जात आहेत. त्यामुळे उत्पन्न मिळण्याची आशा असलेल्या उभ्या पिकांवरच आता रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ ? शेतकऱ्यांवर आली आहे.
पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी करावी, अशी मागणी फाटे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील पावसाची स्थिती, पिकांची सद्यस्थिती आणि झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात सुरळीत वीजपुरवठा, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, अशी मागणीही धीरज फाटे यांनी केली आहे. दरम्यान, शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पीक नुकसानीचे पंचनामे, नुकसानभरपाई आणि दुष्काळी उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

No comments